Raigad Lanslide: मृतदेहांचा खच, अश्रू आणि आक्रोश; ८५ पैकी ४२ मृतदेह सापडले, ४३ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:45 AM2021-07-25T07:45:47+5:302021-07-25T07:49:00+5:30
गुरुवारी दरड पडल्याने तळीयेमधील ८५ हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली हाेती.
रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात मृतांचा खच, अश्रू आणि आक्राेश पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळी बचावकार्याला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. उद्या पुन्हा बचावकार्य हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महाड-तळीये येथील ४२ आणि पाेलादपूर येथील ११ अशा एकूण ५५ नागरिकांचा मृ्त्यू झाला आहे. दाेन्ही दुर्घटनेत २२ जण जखमी झाल्याने त्यांच्यावर स्थानिक आणि एमजीएम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दरड पडल्याने तळीयेमधील ८५ हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली हाेती. मृतदेह बाहेर काढताना जाेरदार पावसामुळे अडथळा निर्माण हाेत हाेता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत हाेता. मात्र जेसीबी चिखलात रुतत हाेता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बचावकार्य थांबवण्यात आले हाेते. शनिवारी सकाळी पुन्हा शाेधमाेहीम हाती घेण्यात आली. जाेरदार पावसामुळे आणि दाट धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळा येत हाेता. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ४२ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
बेपत्ता ग्रामस्थांच्या शोधासाठी माेहीम
दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या व्यक्ती पाण्याच्या लोंढ्यामुळे कुठे वाहून गेल्या का, यासाठी आजूबाजूच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत सापडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक या परिसरात धाव घेत असल्याने त्यांना माहिती पुरवण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवस्थेसाठी स्थानिक तरूणांनी तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.