अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघातील १६४४ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेकरिता १५ हजार मतदान अधिकारी व कर्मचारी सोमवारी ६०४ एसटी बसेसमधून रवाना झाले असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, एक प्रथम मतदान अधिकारी आणि दोन इतर मतदान अधिकारी असे एकूण ४ मतदान अधिकारी असतील. सर्व मतदान केंद्रांसाठी १० टक्के राखीव मतदान अधिकारी मिळून १६४४ मतदान केंद्राध्यक्ष, १६४४ प्रथम मतदान अधिकारी, ३२८४ इतर मतदान अधिकारी असे ६५७२ अधिकारी व कर्मचारी असतील. यामध्ये २६२५ महिला आहेत. याशिवाय आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व इतर मिळून १५ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.दरम्यान, सोमवारी सकाळी अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या येथील जे.एस.एम. कॉलेजमधील मतदान यंत्र व अधिकारी-कर्मचारी प्रस्थान केंद्रास डॉ.सूर्यवंशी यांनी स्वत: भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी केली. तर अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून अखेरच्या टप्प्यात आवश्यक ते मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये या कामाचा इतका उत्साह आहे की, त्यांनी प्रशिक्षणात खूप चांगला सहभाग घेतला. प्रात्यक्षिके करून पाहिली. अलिबागमधील चार कर्मचाऱ्यांनी ज्यांना मतदान अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश दिले होते त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून अधिक मोठी जबाबदारी मिळावी अशी मागणी केल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
रायगड लोकसभा मतदारसंघ: १५ हजार अधिकारी, कर्मचारी केंद्रांवर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:03 AM