अनंत गीते यांच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 03:47 PM2019-04-17T15:47:01+5:302019-04-17T15:48:31+5:30
प्रचार साहित्यावर नाव नसल्याने प्रकाशक-मुद्रकाविरुध्द गुन्हा दाखल, उमेदवार मात्र सहिसलामत
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात सेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडून प्रचाराकरीता वाटप करण्यात आलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेवर मुद्रक आणि किती प्रती छापल्या या बाबतचा अनिवार्य मजकूर छपाई करण्यात आला नसल्याने, झालेल्या निवडणूक आचार संहिता भंगते प्रकरणी अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेख प्रमुख व अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेष चौधरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार या पुस्तिकेचे मुंबईतील मुद्रक व प्रकाशक यांच्या विरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 127 (क)अन्वये गुन्हा दाखल
सेना-भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या या ‘सिंहावलोकन’ पुस्तिकेवर भारत निवडणूक आयोग आचारसंहिता नियम व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अन्वये अनिवार्य असणारा मजकूर छापला नसल्याने या पुस्तिकेचे प्रकाशक मुंबईतील मालाड पश्चिम येथील अनिरुद्ध गांधी आणि मुद्रक श्री इंटरप्रायझेस, गोरेगाव(पश्चिम) यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 127 (क)अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या पुस्तिकेचा वापर करणारे सेना-भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते हे सहिसलामत वाचले आहेत.
अलिबाग उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवार गीते यांना बजावली नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रतिनिधी अॅड. सचिन जोशी यांनी ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेवर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नसल्यामुळे आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार रायगड निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केली होती. या बाबत अलिबाग उपविभागीय अधिकारी तथा अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी शिवसेना उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे या बाबत म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती.
सुनावणीअंती गुन्हा दाखल करण्याचे आदेश
या बाबत सेना उमेदवार अनंत गीते त्यांचे वकील अॅड. एन. टी. रातवडकर यांनी, या ‘सिंहावलोकन’ पुस्तिकेच्या छपाईचे बिल व बिलाच्या प्रती सादर केल्या. ‘सिंहावलोकन’ पुस्तिका ही प्रचार साहित्य म्हणून सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता वितरीत झाली व त्यावर मुद्रक तसेच प्रकाशकाचे नाव नसल्याने ती छापून घेणारे प्रकाशक अनिरुद्ध गांधी, रा. मालाड पश्चिम आणि मुद्रक श्री इंटरप्रायझेस, 5०1, गोरेगाव पश्चिम यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 127(क) प्रमाणो पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश अलिबाग उपविभागीय अधिकारी तथा अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिले. त्यानुसार अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेख प्रमुख व अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेष चौधरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार या पुस्तिकेचे मुंबईतील मुद्रक व प्रकाशक यांच्या विरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.