रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: जनतेला दिलेला कौल मान्य- अनंत गीते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 03:01 PM2019-05-23T15:01:42+5:302019-05-23T15:02:21+5:30
शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.
रायगडः शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जनतेने दिलेला कौल मी मान्य केला आहे. पराभव कुणामुळे झाला त्याचे विश्लेषण मी करणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रायगडचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे. रत्नागिरीतून चार वेळा तर रायगडमधून दोन वेळा असे कोकणातून सहा वेळा खासदार झालेल्या गीतेंचा पराभव याचा मोठा धक्का सेनेला बसला आहे.
राज्यभरात शिवसेना-भाजपा युती जोरदार मुसंडी मारली असताना रायगडमध्ये मात्र युतीला धक्का बसला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे 21 हजार मतांनी निवडून आले आहेत. तटकरेंनी केंद्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांना पराभवाचा धक्का दिला.
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अखेरपर्यंत अटीतटीची झुंज सुरू होती. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये सुनील तटकरे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणीच्या मध्यावर तटकरे यांनी घेतलेली आघाडी मोडून काढत अनंत गीते यांनी आघाडी घेतली होती. मात्र दोन्ही नेत्यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नसल्याने या मतदारसंघात टफफाईट सुरू होती. अखेरीस सुनील तटकरे यांनी सुनील तटकरे यांनी 21 हजार मतांनी विजय मिळवला. गेल्या दोन तीन दशकात अपवाद वगळता कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे निवडून आले होते.