गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
By निखिल म्हात्रे | Published: May 3, 2024 11:27 AM2024-05-03T11:27:13+5:302024-05-03T11:27:54+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत.
अलिबाग : जिल्ह्यातील रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या गृह मतदानासाठी राष्ट्रीयीकृत बँक आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या कंपन्यांचे कर्मचारी मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून काम पाहत आहेत. सात विधानसभा मतदारसंघांत १०९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांमुळे बँकांचे कामकाजावर परिणाम झालेला नसल्याचे जिल्हा अग्रणी बँकेतर्फे सांगण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी, तर मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद, इतर शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तर राष्ट्रीयीकृत बँक व जेएनपीटी, ओएनजीसी, आरसीएफ, गेल, एलआयसी आदी कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यात आली आहेत. गृह मतदान आणि सुविधा केंद्रांवर मायक्रो ऑब्जर्व्हर म्हणून हे कर्मचारी काम करणार आहेत.
१०९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड
रायगड लोकसभा मतदारसंघात ३० एप्रिलपासून गृह मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, ती ४ मेपर्यंत चालणार आहे. यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघात ८, कर्जत ४, उरण ८, पेण २४, अलिबाग २७, श्रीवर्धन २१ आणि महाड १८, असे एकूण १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे कर्मचारी फक्त गृह मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत, तसेच संवदेनशील मतदान केंद्रांवर ३२ मायक्रो ऑब्जर्व्हर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत. बँक शाखांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी शाखांमध्ये आवश्यक तो कर्मचारी वर्ग ठेवण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे. कर्मचारी वर्ग कमी झाल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाल्याची तक्रार आपल्याकडे आलेली नाही. - विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, रायगड
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांकडे मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून काम असणार आहे.- स्नेहा उबाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड.