अलिबाग : येथील रायगड बाजार इमारत बांधकाम सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. शेकाप विरुध्द काँग्रेस आणि भाजपा असा राजकीय वाद पेटला आहे. या प्रकरणी अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्यास आणि श्रीबाग संस्थेला दिलेल्या परवानगीला आव्हान देण्यास नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने इमारतीच्या बांधकामाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना अलिबाग येथे रायगड बाजार उभारायचे आहे. अलिबाग नगर पालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. याच नगर पालिकेच्या ताब्यातील स.नं. ७ / २, सि.स.नं. १३२४ मधील १२४० चौ.मी. असणाऱ्या जमिनीवर श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळ लि. च्या माध्यमातून रायगड बाजार त्यांना उभारायचे आहे. या आधीचे बांधकाम बेकायदा असल्याने पाडले होते. आता रायगड बाजार नव्याने उभारण्यात येत आहे. आ. पाटील हे सत्तेच्या जोरावर कायदा धाब्यावर बसवित असल्याचे अलिबागचे काँग्रेसचे माजी आ. मधुकर ठाकूर आणि भाजपाचे अॅड. महेश मोहिते यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अॅड. महेश मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ठाकूर यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. इमारतीचे बांधकाम सीआरझेड-१मध्ये येत असून कांदळवनांची तोड करणे यासारखे अन्य महत्त्वाचे मुद्दे अॅड. मोहिते यांनी न्यायालयात मांडले आहेत. बांधकाम सीआरझेडमध्ये येते की नाही हे सक्षमपणे फक्त एमसीझेडएमए सांगू शकते. त्यामुळे त्यांना या प्रकरणात पार्टी करण्याची गरज न्यायालयाने मान्य करुन अॅड. मोहिते यांना कागदपत्रे सादर करण्यास तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. प्रकरण न्यायालयात सुरु असताना एमसीझेडएमएने त्यांना परवानगी देणे चुकीचे असून ७ आॅगस्ट २०१५ ला न्यायालयाने बांधकाम न करण्याचा दिलेला आदेश कायम असल्याचे अॅड. मोहिते यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
रायगड बाजारवरून वाद पेटला
By admin | Published: December 07, 2015 1:18 AM