- निखिल म्हात्रेअलिबाग - ग्रामीण भागात वाढत्या आधुनिकीकरणातून अनेक हायटेक बदलांना सुरुवात झाली आहे. शासकीय योजनांचा लाभ असो की शालेय शिक्षण, आरोग्य व्यवस्था अगर बाजारातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी आता सगळीकडे कॅशलेस व्यवहाराला अधिक पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ऑनलाईन क्यूआर कोडची चलती आहे.
शहरातील बाजारापेठांत इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध झाली आहेत. आता ग्रामीण भागातही मोबाईल, इंटरनेटने वेग पकडल्यामुळे शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे. आता पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची मुळीच गरज नाही. अगदी दूधवाला, भाजीवाला, राशन दुकानदारांकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाईन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. संसारोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, भाजीपाला, फेरीवाल्याकडील खाऊ घ्यायचा असला तरी क्यू-आर कोड स्कॅन केला जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण 40 टक्के असून आता खिशात नव्हे; तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवा, अशी अवस्था निर्माण झाली आहे. खबरदारी बाळगणे गरजेचे ऑनलाईन व्यवहाराला चालना देण्याची घोषणा शासनस्तरावरून करण्यात आली. सुरुवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले असून सध्या रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने घटून डिजिटल पेमेंटला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे; परंतु नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करत असताना पुरेपूर खबरदारी बाळगायला हवी, असे आवाहन पोलिस प्रशासन व बँकांद्वारे केले जात आहे. भाजीपाला, किराणा, बेकरी विक्रेताही हायटेक केवळ मोठे दुकानदारच नव्हे; तर चक्क पाणीपुरी, समोसा अन् कचोरी विकणाऱ्यांनीही ग्राहकांच्या सोयीसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. यासह भाजीपाला विक्रेत्यांनाही ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफरचा पर्याय खुला करून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र कॅशलेस व्यवहार पहायला मिळत आहे. सुरुवातीला आम्ही वस्तूच्या बदल्यात वस्तू अगर त्याबदल्यात एखादे काम या पद्धतीने व्यवहार करीत असायचो, असे माझे आजोबा सांगायचे; परंतु आता कॅशलेस व्यवहार प्रक्रिया आल्याने साध्या दुकानापासून ते मोठ्या दुकानदाराकडेदेखील क्यूआर कोड वापरून व्यवहार केले जातात.- दिशा पाटील, गृहिणी.