माणगाव : कुणबी समाज मोठा आहे, याची मला जाणीव आहे. तसेच येथील खासदार २० वर्षे झाली लोकसभेच्या सभागृहात, सत्तेत आहेत; पण काहीच बोलत नाही मौनीबाबा, असा टोला खा. अनंत गीतेंना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माणगाव येथील सभेत लगावला. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांवर चौफेर टोलेबाजी केली.वंचित आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांच्या प्रचारसभेचे आयोजन माणगावमध्ये अशोकदादा साबळे विद्यालयात करण्यात आले होते, या वेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. ज्या खोती पद्धती नष्ट झाल्या, जो जमिनी कसत होता त्याचे नाव त्यावर लागले पाहिजे. २० वर्षे झाली तरी एकदाही आदेश काढला नाही. ‘जो कसेल त्याची जमीन’ या कायद्यची १९६५ नंतर अंमलबजावणी झाली नाही. काँग्रेस ५० तर युतीच्या सरकारने २० वर्षे सत्ता भोगली, तरी कसेल त्याची जमीन कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. या वेळी तुम्ही सुमन कोळींना मतदान करून निवडून द्या, मग या कायद्याची अंमलबजावणी करू, असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले.या निवडणुकीत आता मतदानाला दोन हजार रु पये मिळणार जर हा बाजार मांडायचा असेल तर व्यवस्थित मांडा, घरामध्ये काय कमी आहे. दोन हजारांमध्ये काय होणार? यांनी तर कोेट्यवधी रु पये लुटले आहेत. त्यांचे पैसे आपण लुटले तर पाप होत नाही. हेमंत करकरे, कामटे, साळसकर,ओंबळे हे मुंबई हल्ल्यात अतिरेकी कसाबने हल्ला केल्याने शहीद झाले. तर साध्वी म्हणते करकरे यांना मी शाप दिला म्हणून मेले. भाजप सरकार यावर काहीच बोलत नाही. मोहन भागवत, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे एकही शब्दांनी बोलत नाहीत. यांच्या मनामध्ये काय आहे? त्यामुळे पोलिसांमध्येसुद्धा चीड निर्माण झाली आहे. औरंगाबाद येथील पोलीस अधिकारी म्हणत होते की, यावेळेस भाजपला मतदान करणार नाही. काँग्रेससुद्धा मोदीच चालवत आहेत. देशभरामध्ये काँग्रेसने इतरांबरोबर युती केली नाही. मोदी हा दहावी नापास डॉक्टर आहे. याच्या आॅपरेशन टेबलवर सोनिया गांधीचे कुटुंब आहे. आॅपरेशन करायला लावले तर जावई आतमध्ये गेले असते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी बाबत काँग्रेस अपप्रचार करीत असते ते जातिवादी, धर्मांध आहेत. काँग्रेसने बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेसने युती करण्यासाठी माझ्याकडे पाहिली अट घातली की एमआयएम सोबत नको. कारण मुस्लिमांचे नेतृत्व करणारा जर पुढे आला तर आपली मुस्लिमांची व्होट बँक बंद होईल ही काँग्रेसला भीती वाटत आहे. या वेळेस प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम समाजालासुद्धा भावनिक आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांना निवडून देण्याचे आवाहन केले.या वेळी जिल्हा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष दीपक मोरे, जिल्हा सचिव हरिश्चंद्र माळी, भारिप जिल्हा महिला अध्यक्षा मेघा रिकामे आदी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
'रायगडमधील खासदार मंत्री झाला तरी मौनीबाबाच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:26 AM