Raigad: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून, आरोपीच्या २४ तासांतच आवळल्या मुसक्या, उरण पोलिसांची दमदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:25 PM2023-01-05T20:25:29+5:302023-01-05T20:26:14+5:30
Crime News: बोकडवीरा येथील ललिता ठाकूर या महिलेची बुधवारी हत्या झाली होती.तिचे हातपाय रस्सीने करकचून बांधुन मृतदेह बाथरूममध्ये टाकून खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी अमोल शेलार फरार झाला होता.
- मधुकर ठाकूर
उरण - भाड्याने दिलेली खोली करण्यासाठी सांगितल्याचा मनात राग धरून आणि अंगावरील दागिन्यांच्या हव्यासापोटीच ५७ वर्षीय वृध्देच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या नराधम भाडेकरू अमोल शेलार (३०) यांच्या उरण पोलिसांनी अहमदनगरमधुन २४ तासात मुसक्या आवळल्या असल्याची माहिती वपोनि सुनील पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन दिली आहे.
बोकडवीरा येथील ललिता ठाकूर या ५७ वर्षीय वृध्द विधवा महिलेची बुधवारी हत्या झाली होती.तिचे हातपायही रस्सीने करकचून बांधुन मृतदेह बाथरूममध्ये टाकून खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी अमोल शेलार (३०) फरार झाला होता.उरण पोलिसांनी न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर व वपोनि सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण,सपोनि विजय पवार यांच्या पथकाने शिताफीने तपास करीत आरोपीच्या अहमदनगर जिल्ह्यातील ढवळगावातुन २४ तासांच्या तपासानंतर मुसक्या आवळल्या आहेत.चौकशीअंती आरोपीने भाड्याने दिलेली खोली करण्यासाठी सांगितल्याचा मनात राग धरून आणि अंगावरील दागिन्यांची हाव सुटल्यानेच ५७ वर्षीय वृध्देचा निर्घृणपणे खुन केला आहे.चोरलेले दागिने शिरुर-पुणे येथील सराफाकडे गहाण ठेवण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.