रायगड नवे जिल्हाधिकारी किशन जावळे
By राजेश भोस्तेकर | Published: February 21, 2024 08:38 PM2024-02-21T20:38:02+5:302024-02-21T20:38:30+5:30
डॉ. योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली.
अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्र सुरू आहे. वर्षभरापूर्वी रायगड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. डॉ योगेश म्हसे यांच्या जागी कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त कोकण विभाग पदी कार्यरत असलेले किशन जावळे हे रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. डॉ योगेश म्हसे यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या महिन्याभरापासून राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या होत आहेत. जिल्ह्यातील काही पोलीस तसेच प्रशासकीय दुय्यम अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी वर्षभरापूर्वी पदभार स्वीकारला होता. वर्षभराच्या काळात डॉ म्हसे यांनी प्रशासनावर पकड निर्माण केली होती. मात्र राजकीय नेत्यांमध्ये फारसा प्रभाव म्हसे हे पाडू शकले नसल्याने त्याच्याबाबत लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सुर होता. त्याचाच प्रत्यय हा म्हसे यांच्या तडकाफडकी बदलीमुळे समोर आला आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गंद्रे यांनी २१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध पत्रक काढून डॉ योगेश म्हसे यांच्या जागी अप्पर कोकण आयुक्त किशन जावळे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. जावळे यांनी त्वरित पदभार स्वीकारावा असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. डॉ योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली झाली असली तरी त्यांना अद्यापही कोणतीही नियुक्ती देण्यात आलेली नाही आहे.