Raigad: फेक व्हिडीओ व्हायरल प्रकरणी न्हावा-शेवा पोलीसांनी आरोपीला गुजरातमधुन घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:35 PM2024-01-18T21:35:56+5:302024-01-18T21:37:16+5:30
Raigad News: व्हॉट्सॲपवर फेक व्हिडिओ व्हायरल करून न्हावा-शेवा परिसरात येणाऱ्या हजारो वाहनचालक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या आरोपी पंकज रामजी गिरी याला न्हावा -शेवा बंदर विभागाच्या पोलिसांनी वडोदरा- गुजरात येथील कार्यालयातुन ताब्यात घेतले आहे.
- मधुकर ठाकूर
उरण - व्हॉट्सॲपवर फेक व्हिडिओ व्हायरल करून न्हावा-शेवा परिसरात येणाऱ्या हजारो वाहनचालक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या आरोपी पंकज रामजी गिरी याला न्हावा -शेवा बंदर विभागाच्या पोलिसांनी वडोदरा- गुजरात येथील कार्यालयातुन ताब्यात घेतले आहे.
आरोपीने 'न्हावा शेवा पोर्ट, रायगड येथे एका सरपंचांच्या मुलाचा अपघात झाल्यामुळे त्याने १११ चालकांना मारण्याची शपथ घेतली आहे. चालकांना दिसेल तिथे कापुन टाकले जात आहे. आतापर्यंत १५ ते २० चालकांना मारून टाकलेले आहेत.पोलीसही चालकांची मदत करत नाहीत. चालकांनी न्हावा-शेवा पोर्टकडे जाऊ नये' अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल केला होता.मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या या फेक व्हिडीओमुळे ट्रेलरचालक व ट्रांसपार्टर्संमध्ये भीती निर्माण झालेली होती.या व्हायरल झालेल्या फेक व्हिडिओमुळे सर्वांकडून विचारणा केली जात होती.यामुळे पोलिस यंत्रणेवर नाहक ताण पडला होता.
न्हावा-शेवा पोर्टमध्ये दररोज सुमारे ३० ते ३५ हजार कंटेनर ट्रेलर वाहनांची वाहतूक होत असते. या फेक व्हिडीओमुळे मात्र पोर्टमध्ये येणा-या ट्रेलरचालकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाल्यामुळे आरोपीस शोध घेऊन कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आदेश दिलेले होते.न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहा. पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक तयार करण्यात आले होते.या पथकात सहा. पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार वैभव शिंदे, विशाल हिंदोळा, दयानंद कवलगीर, जितेंद्र दबके व राम राठोड यांचा समावेश होता.या शोध पथकाने आरोपी पंकज रामजी गिरी याला वडोदरा-गुजरात येथील कार्यालयातुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलेले आहे.त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रकीया सुरू आहे.
तपासामध्ये आरोपीने त्याला मिळालेल्या ऐकीव माहितीच्या आधारे सदरची अफवा पसरवलेली होती असे समोर आले असुन त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. न्हावा -शेवा पोलीसांकडुन सर्व ट्रेलरचालकांना कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेऊ नये.तसेच कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपाआयुक्त पंकज डहाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.