पाण्याचे नमुने गोळा करण्यात रायगड नवव्या क्रमांकावर; जीपीएस मॅपिंगद्वारे पाणीस्रोतांची माहिती संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:54 AM2018-02-13T02:54:14+5:302018-02-13T02:55:07+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश कंपन्या या केमिकलनिर्मिती अथवा प्रक्रिया करणाºया आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्यातील रासायनिक घटकांची तपासणी करण्यासाठी सध्या पाण्याचे नमुने गोळा करण्याचे काम संपुष्टात आले आहे. राज्यामध्ये नमुने गोळा करण्याच्या यादीमध्ये रायगड जिल्ह्याने पहिल्या १०मध्ये स्थान प्राप्त केले आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश कंपन्या या केमिकलनिर्मिती अथवा प्रक्रिया करणाºया आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्यातील रासायनिक घटकांची तपासणी करण्यासाठी सध्या पाण्याचे नमुने गोळा करण्याचे काम संपुष्टात आले आहे. राज्यामध्ये नमुने गोळा करण्याच्या यादीमध्ये रायगड जिल्ह्याने पहिल्या १०मध्ये स्थान प्राप्त केले आहे. आता त्या नमुन्यांचे रासायनिक परीक्षण झाल्यावर किती हानिकारक घटक त्या पाण्यात आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्य सरकारने जीपीएस मॅपिंगद्वारे पाण्याच्या स्रोतांची माहिती एकत्रित केली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांत तब्बल दोन लाख ६९ हजार ९०० पाण्याचे स्रोत आहेत. पैकी ९३ हजार ८३४ पाणीस्रोतांतील फक्त ३४.८ टक्के नमुने गोळा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. रायगड जिल्हा क्रमावारीत नववा आहे.
पाण्याचे स्रोत शुद्ध असतातच असे नाही. याच स्रोतातून पिण्याच्या पाण्याचा वापर नागरिक करीत असतात. त्यासाठी हे पिण्याचे पाणी पिण्यालायक आहे की नाही, याबाबतची तपासणी वर्षातून दोन वेळा म्हणजे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजार ५६ पाण्याचे स्रोत आहेत. पैकी तीन हजार २५ पाण्याचे नमुने (५९.८ टक्के) गोळा करण्यात संबंधित ग्रामपंचायतींना यश आले आहे.
पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबर २०१७पर्यंत मुदत दिली होती. काही जिल्ह्यांचे काम समाधानकारक नसल्याने त्यांना ३१ जानेवारी २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीही मुदत आता संपली आहे. त्यामुळे पाण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. परंतु ५९.८ टक्के गोळा करण्यात आलेल्या पाण्याच्या नुमन्यांमध्येच हानिकारक ठरणाºया स्रोतांना स्थान देण्यात आल्याचा दावा पाणी व स्वच्छता विभागाने केला आहे.
पाण्याचे नमुने गोळा केल्यानंतर रायगडच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अखत्यारीत असणाºया अलिबाग येथील जिल्हा प्रयोगशाळेत त्याचप्रमाणे पेण, कर्जत, रोहे, माणगाव आणि महाड येथील उपविभागीय प्रयोगशाळेमध्ये तपासणी केली जाते.
या पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेड, फ्लोराईड, क्लोरीन, लोह, गढूळता, रंग, वास, कठीणता, घनद्रव्य यांसह अन्य घटक तुलनात्मकदृष्ट्या जास्त आढळल्यास ते पाणी पिण्यायोग्य नसते. २०१७ साली जिल्ह्यातील पाच ठिकाणी रसायनांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले होते. तसेच पनवेल तालुक्यामध्येही दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या स्रोतांमध्ये नायट्रेडचे प्रमाण दिसून आले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील स्रोतांचे पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले असून लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले.
- पहिल्या क्रमांकावर वर्धा जिल्ह्याने बाजी मारली आहे, तर त्याखालोखाल गोंदिया, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याचा नंबर लागला आहे. हिंगोली सहाव्या तर, धुळे सिंधुदुर्ग यांचा अनुक्रमे सातवा आणि आठवा क्रमांक लागतो. सर्वांत शेवटी ३४व्या क्रमांकावर उस्मानाबाद जिल्हा आहे.