रायगडमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:21 AM2019-04-24T00:21:30+5:302019-04-24T00:21:54+5:30
तुरळक घटना वगळता मतदान शांततेत; १६ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५८.०६ टक्के मतदान झाले आहे. अंतिम मतदान ६० टक्केपर्यंत होईल असा अंदाज रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. २०१४ साली लोकसभेसाठी ६४.५७ टक्के मतदान झाले होते. आता २०१९ मध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार गेल्या वेळच्या तुलनेत चार टक्क्यांनी मतदानाची आकडेवारी घसरली आहे. अद्यापही उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदान सुरू असल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. सेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे सुनील तटकरे यांच्यासह एकूण १६ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद झाले आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदान संध्याकाळी ६ वाजता संपले आणि अंतिम मतदान ६२.२३ टक्के झाले आहे. दरम्यान संध्याकाळी ६नंतर पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर येथे मतदान सुरू होते, ते पूर्ण झाल्यावर अंतिम मतदान आकडेवारी उपलब्ध होऊ शकेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. संध्याकाळी ५वाजेपर्यंत रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण ५३.१५ टक्के मतदान झाले. यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांपैकी अलिबाग विधानसभा मतदारसंघात ६२.२३ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. रायगडमध्ये निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी १५६ पोलीस अधिकाऱ्यांसह ८०० होमगार्ड व ९० दंगा प्रतिबंध दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ दलाच्या जवानांचा बंदोबस्त होता.
दापोलीमध्ये महिला मतदार आघाडीवर
रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार २३८ पैकी ५४.१० टक्के म्हणजे १ लाख ५१ हजार ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात २ लाख ३९ हजार ४१५ पैकी ५२.३२ टक्के म्हणजे १ लाख २५ हजार २५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण १६ लाख ५१ हजार ५६० मतदारांपैकी ४ लाख ४१ हजार ७३६ पुरुष तर ४ लाख ३६ हजार ६० महिला अशा ५३.१५ टक्के म्हणजे ८ लाख ७७ हजार ७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
रोह्यात मतदारांना पैसे वाटणाऱ्यांना पिटाळले
रोहा : रायगड लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी रोह्यात धिम्या गतीने मतदान झाले. परिणामी, मतदानाचा टक्का घसरला. यंदा लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदारांना आमिषे दाखवत पैसे वाटण्याचे प्रकार घडले. रोहा शहरात तर ठिकठिकाणी हे प्रकार घडले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक परदेशी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. परिणामी, रोहा पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाने अनेक ठिकाणी गस्त देत मतदारांना पैसे वाटण्यासाठी गेलेल्यांना पिटाळून लावले.
अधिकृत आकडेवारी आली नसली, तरी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे ५२.७८ टक्के मतदान श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात झाले आहे. सकाळपासून लोकांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. केंद्र ठिकाणी महिला व
पुरु षांना मिळून एकच बूथ असल्याने मतदानासाठी विलंब होत होता. त्यामुळे नेहरूनगर शाळा क्र मांक आठ येथे मतदारांनी संबंधित अधिकाºयांकडे दुपारी नाराजी व्यक्त केली.
महाडमध्ये वादावादीच्या किरकोळ घटना
महाड : महाड शहरात एकूण २३ मतदान केंद्रांवर सरासरी ५८ टक्के मतदान झाले. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी मतदान केंद्राबाहेर शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादीच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. अनेक ठिकाणी सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. मुस्लीमबहुल भागातील मतदान केंद्रांवर मुस्लीम मतदारांचा चांगला उत्साह असल्याचे दिसून आले. कुठलाही गैरप्रकार वा अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.