उरण - चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे गावकऱ्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे यांची गंभीरपणे दखल घेऊन तहसिलदार, जिल्हाधिकारी व प्रशासनाने चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी चिरनेर गावाच्या पाहणी दौऱ्यात केली आहे.
चिरनेर गावालगत बेकायदेशीर होत असलेल्या कंटेनर यार्ड व त्यासाठी भराव करताना नैसर्गिक नाले,गटारे बुजविण्यात येत आहेत.तसेच रस्त्याच्या बाजूने नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्यासाठी लागणारी गटारे अतिशय छोटी व अयोग्य आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गटारांवर बेकायदेशीर बांधकामे केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही व पाणी दरवर्षी गावात शिरते आणि पुरपरिस्थिती उद्भवते.
याची गंभीर दखल घेऊन तहसिलदार, कलेक्टर व प्रशासनाने चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी महेंद्र घरत यांनी केली आहे.यासाठी पाठपुरावा करू असे पाहणी दौरा प्रसंगी त्यांनी सांगितले.