निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: 6 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळयाकरीता रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहणा-या शिवभक्तांस आपली सेवा देण्याकरीता "सदैव सेवेसी तत्पर" हया रायगड पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याने रायगड पोलीस सज्ज झाले असुन सोहळयाकरीता जवळपास 1400 पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्ताकरीता तैनात करण्यात आलेले आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळा निर्विघ्न पार पाडावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडु नये याची सर्वातोपरी काळजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक रायगड यांनी घेतली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता बाहेरील जिल्ह्यातून बंदोबस्त मागविण्यात आला असून बंदोबस्ताकरीता असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आवश्यक अश्या काही उपयुक्त साहित्यांचे (खाजगी कीट) वाटप करण्यात आले. यात कॅप, मास्क , ब्रश, कोलगेट, ओडोमोस, एनर्जी पावडर पाऊच, मेडिकल जेल (पेन फ्री) आदी गोष्टींचा समावेश आहे.
राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्राथमिक पुर्व तयारी करण्यात आलेली आहे. आपातकालीन वेळेस प्राधान्याने लागणा-या लहान-लहान गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक रायगड यांनी रायगड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या कडुन पुर्व तयारी करून घेतली आहे. बंदोबस्तामध्ये लागणारे अत्यावश्यक असणा-या संरजामासहीत रायगड पोलीस प्रशासन शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडण्यास सज्ज असुन सोहळ्यास येणा-या शिवभक्तांना देखील पोलीस प्रशासनाच्या वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.