शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज; १४०० अधिकारी, कर्मचारी तैनात

By राजेश भोस्तेकर | Published: June 5, 2024 05:11 PM2024-06-05T17:11:01+5:302024-06-05T17:11:41+5:30

यंदा ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न होत आहे. सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले.

Raigad police administration ready for Shiva Rajyabhishek ceremony 1400 officers, staff deployed | शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज; १४०० अधिकारी, कर्मचारी तैनात

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज; १४०० अधिकारी, कर्मचारी तैनात

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा ६ जून रोजी किल्ले रायगडवर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा ३५१ वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न होत आहे. सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहणा-या शिवभक्तांस आपली सेवा देण्याकरीता 'सदैव सेवेसी तत्पर' हया रायगड पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याने रायगड पोलीस सज्ज झाले असुन सोहळयाकरीता जवळपास १ हजार ४०० पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्ताकरीता तैनात करण्यात आलेले आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळा निर्विघ्न पार पाडावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडु नये याची सर्वातोपरी काळजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घेतली आहे. गत वर्षीच्या अनुभवाने किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची सुरक्षा बाधित ठेवण्यासाठी पूर्ण तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. 

शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता बाहेरील जिल्ह्यातून बंदोबस्त मागविण्यात आला असून बंदोबस्ताकरीता असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आवश्यक अशा काही उपयुक्त साहित्यांचे (खाजगी कीट) वाटप करण्यात आले. यामध्ये कॅप, मास्क, ब्रश, कोलगेट, ओडोमोस, एनर्जी पावडर पाऊच, मेडिकल जेल (पेन फ्री) या किटचे वाटप पोलिसांना करण्यात आले आहे. 

कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्राथमिक पुर्व तयारी करण्यात आलेली आहे. आपातकालीन वेळेस प्राधान्याने लागणा-या लहान-लहान गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या कडुन पुर्व तयारी करून घेतली आहे.

बंदोबस्तामध्ये लागणारे अत्यावश्यक असणा-या संरजामासहीत रायगड पोलीस प्रशासन शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडण्यास सज्ज असुन सोहळ्यास येणा-या शिवभक्तांना देखील पोलीस प्रशासनाच्या वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Raigad police administration ready for Shiva Rajyabhishek ceremony 1400 officers, staff deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.