अलिबाग : सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये रायगड जिल्हयाने सन २०२२, २०२३ मध्ये यशाचं शिखर सर करीत वेळोवेळी राज्यात आपली सरशी सिध्द केली आहे. त्यामुळे रायगड पोलीस दलाच्या नावाचा देशभर डंका वाजत आहे. रायगड पोलीस दलातील पोह जयेश पाटील यांना सन २०२३ मधील सीसीटीएनएस, आयसीजेएस कार्यप्रणाली राबविण्याकरिता केलेल्या वैयक्तिक विशेष कामगिरी पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले आहे.
रायगड पोलीस दलाने सन २०२३ मध्ये जुलै व ऑक्टोबर मध्ये प्रथम क्रमांक, फेब्रुवारी, एप्रिल, मे,जुन मध्ये व्दितीय क्रमांक, जानेवारी,मार्च व सप्टेंबर मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करीत अनेक वेळा आपल्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहे. आपल्या दैदीप्यमान कामगिरीची घोडदौड सुरू ठेवत सन २०२३ चे वार्षिक तृतीय क्रमांकाचे पारितोषीक देखील प्राप्त केले.
परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा, पोलीस कर्तव्य मेळावा, सीसीटीएनएस प्रणाली, महिला सुरक्षा, सलग २ वेळा बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार, सागर सुरक्षेचे बेस्ट अशोर युनिट पुरस्कार असे अनेक खिताब आपल्या नावावर करीत रायगड पोलीस नाव अखंड महाराष्ट्रात गाजायला लागले. अशाच वेळी रायगड पोलीस दलातील कार्यरत असलेले पोलीस हवालदार जयेश विलास पाटील यांनी रायगड पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
एनसीआरबी, नवी दिल्ली येथून देश भरातील विविध राज्याकडून सीसीटीएनएस, आयसीजेएस प्रणालीच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी वैयक्तिक पुरस्कार प्रणाली करिता विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे नामनिर्देशन मागविण्यात येतात. त्यांच्या कामगिरी नुसार कार्यप्रणाली तथा पोलीस कार्यपद्धती एनसीआरबी दिल्ली येथे पाठविले जाते, तेथे त्यांच्या कामगिरीची छाननी होऊन सदर पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एनसीआरबी पुरस्कारा करिता निवड केली जाते.
रायगड पोलीस दलातील पोह जयेश पाटील यांना सन २०२३ मधील सीसीटीएनएस, आयसीजेएस कार्यप्रणाली राबविण्याकरिता केलेल्या वैयक्तिक विशेष कामगिरी प्रित्यर्थ एनसीआरबी, नवी दिल्ली यांचा देश स्तरावर विशेष कौतुक करण्यात येऊन, वैयक्तिक विशेष कामगिरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी, एनसीआरबी नवी दिल्ली , महीपालपुर येथे प्रदान करण्यात आला.
पोह जयेश पाटील यांनी आपल्या कार्यकाळात रायगड पोलीस दलाच्या नावलौकिकात सीसीटीएनएस कक्ष, येथून आपले वैयक्तिक योगदान देत रायगड पोलीस दलाचे नाव महाराष्ट्र राज्यासह देश पातळीवर झळकविले आहे व रायगड पोलिसांच्या शिरपेचात आणखी तुरा रोवला आहे.
पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे , अपर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे व माझ्या सहकाऱ्यांनी मला नेहमी काम करण्याची प्रेरणा दिली माझ्या प्रत्येक कामात प्रोत्साहित केले, त्यामुळेच आज मी रायगड पोलिसांचे नाव देश पातळीवर झळकावू शकलो याचा मना पासून खूप समाधान आहे. यापुढे ही रायगड पोलीस दलाचे नाव अग्रस्थानी ठेवण्यासाठी मी माझी वैयक्तिक उत्तम कामगिरी देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन. जयेश विलास पाटील, पोह, सीसीटीएनएस कक्ष, रायगड