ड्रोन कॅमेराने वाहतुकीवर रायगड पोलिसांचे नियंत्रण; परतीचा प्रवास झाला सुखकर
By राजेश भोस्तेकर | Published: January 1, 2024 03:26 PM2024-01-01T15:26:14+5:302024-01-01T15:26:41+5:30
सणाची सुट्टी पडली किंवा एखादा मोठा विकेंड आला तर पर्यटक हे पर्यटन करण्यास बाहेर पडतात.
अलिबाग : सणाची सुट्टी पडली किंवा एखादा मोठा विकेंड आला तर पर्यटक हे पर्यटन करण्यास बाहेर पडतात. मुंबई, पुणे, ठाणे तसेच राज्यातील पर्यटकांची रायगड हे पर्यटन साठी आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे लाखो पर्यटक हे सुट्टीची मजामस्ती करण्यास जिल्ह्यात येत असतात. पर्यटक हे मोठ्या संख्येने आपल्या वाहनाने येत असल्याने महामार्ग, अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी समस्या नेहमीच उद्भवत असते. नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने यंदा पहिल्यांदाच द्रोण कॅमेरेद्वारे वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे पर्यटकांचा परतीचा प्रवास हा सुखकारक झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा, मुंबई पुणे या महामार्गासह पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते हे सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडीने ग्रासले जातात. त्यामुळे रायगड.पोलिसांना सुट्टीच्या दृष्टीने अधिकचा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करावा लागतो. मात्र वाहने लाखो आणि पोलीस यंत्रणा कमी यामुळे वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होत असते. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक प्रवाशाचाही वेळ वाहतूक कोंडीत खर्चिक पडतो. अनेकवेळा चालकाच्या बेशिस्ती पणामुळे वाहतूक कोंडी समस्या उद्भवत असते. याचा त्रास हा प्रवासी, पोलीस यांनाही भोगावा लागतो.
नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ३० डिसेंबर रोजी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी घार्गे यांनी पत्रकाराना काही सूचना असल्यास सांगा म्हटले. त्यानुसार वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी द्रोण कॅमेराचा वापर करण्याबाबत पत्रकारांनी सूचना केल्या. या सूचनेचा रायगड पोलिसांनी स्वागत करून त्यादृष्टीने उपाय योजना केली. त्यामुळे नव वर्ष स्वागताला आलेल्या पर्यटकांची वाहतूक कोंडी सोडविण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.
मुंबई गोवा, मुंबई पुणे, अलिबाग वडखळ, अलिबाग रोहा, रेवदंडा, माणगाव या रस्त्यावर पोलिसांनी द्रोण कमेराने वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवले होते. यामुळे वाहतूक कोंडी कुठे आहे, पुढील नियोजन कसे करावे याची इतभुत माहिती द्रोण द्वारे पोलिसांना मिळाली. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यात चांगले यश पोलिसांना आले आहे. महत्वाच्या सण काळात द्रोण कॅमेराच्या सहाय्याने वाहतूक कोंडी सोडविणे आता शक्य होणार आहे.