जयंत धुळप
अलिबाग - खून, दरोडे, मोठ्या घरफोड्यांमधील गुन्हेगारांचा छडा लावण्यात अनन्य साधारण कामगिरी बजावून आपल्या 10 वर्षांच्या सेवाकाळात रायगडपोलिसांची शान असणाऱ्या पोलीस डॉग 'मायलो 'चे सोमवारी निधन झाले. रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन फैरींची अखेरची मानाची सलामी देत मायलोवर संपुर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायलोचा रायगड पोलीस दलात दाखल होण्याचा इतिहास मोठा रोकच आहे. २०११ पोलीस मुख्यालय परेड मैदान येथे कडक शिस्तीचे वरिष्ठ अधिकारी रायगड पोलीस दलातील श्वानांची पाहणी करत होते. हॅन्डलरने दिलेल्या प्रत्येक कमांडवर रायगड पोलीस दलातील श्वान मायलो आपले काम चोख बजावत होता. परंतु डॉबरमॅन जातीच्या श्वानाकडून वरिष्ठांना अभिप्रेत असणारी आक्रमकता काही दिसून येत नव्हती. अधिकाऱ्यांनी तशी त्यांची खंत डॉगच्या हॅन्डलरकडे बोलून दाखवली.
हॅन्डलरने डॉगला एका विशिष्ट वस्तूला गार्ड करण्याची कमांड दिली आणि मैदानातील कुठल्याही व्यक्तीने ती उचलून दाखविण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही जण ती वस्तू उचलण्यास गेले असता शांत आणि संयमी दिसणाऱ्या श्वान मायलोने आपला पवित्रा क्षणार्धात बदलला आणि आक्रमक रूप धारण केले.त्याच्या जबड्यातील त्या दातांच्या सुळक्यांना पाहून समोरचा व्यक्ती कितीही धीट असो तो गलितगात्र न झाला म्हणजे नवल. त्याच्या गर्जनानी मैदान दुमदुमुन गेले. त्यावेळी हॅन्डलरने जे सांगितले त्यावरून या श्वानांची पराकोटीची आज्ञाधारकता दिसून येते हॅन्डलरच्या सांगण्याप्रमाणे जोपर्यंत ती कमांड बदलली जात नाही तोपर्यंत स्वतः हॅन्डलर ही ती वस्तू उचलू शकत नाही इतके हे श्वान आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.
श्वान मायलोचा जन्म ४ जून २००८ साली झाला असून अवघ्या दोन महिन्यांचा असताना तो पोलीस दलात दाखल झाला होता. मागील १० वर्षांत एकूण ५९१ प्रकरणात त्याने सहभाग घेतला होता. यात जिल्ह्यातील एकूण ४३ गुन्हे उघडकीस आणले होते. त्यापैकी ५ खून, १७ घरफोडी, २१ चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे. मायलो हा मागील एक ते दीड वर्षापासून आजारी असल्याने त्याच्यावर अलिबाग पशुवैद्यकीय रुग्णाल्यात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.पोलीस दलात श्वानांचा काम करण्याचा कालावधी साधारणता १० वर्षांचा असतो. मायलोस १० वर्ष पूर्ण होऊनही आजारी असल्याने त्यास कामावरून कमी न करता औषधोपचारांसाठी श्वान पथक रायगड येथे ठेवण्यात आले होते. आज मायलोवर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.