नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिल्यांदाच द्रोण कॅमेरे द्वारे टेहळणी

By राजेश भोस्तेकर | Published: December 30, 2023 12:55 PM2023-12-30T12:55:08+5:302023-12-30T12:55:17+5:30

रायगड जिल्हा हा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेला आहे.  

Raigad Police Force ready to welcome New Year; Surveillance through drone cameras for the first time to solve traffic jams | नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिल्यांदाच द्रोण कॅमेरे द्वारे टेहळणी

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिल्यांदाच द्रोण कॅमेरे द्वारे टेहळणी

अलिबाग : रायगड जिल्हा हा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेला आहे.  मुंबई, पुणे, ठाणे यासह देशातील विविध शहरांतुन मोठया प्रमाणात नववर्ष स्वागतासाठी व पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाची संख्या ही अधिक असल्याने वाहतूक कोंडी समस्या उद्भवणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यावेळी पहिल्यांदाच महत्वाच्या कोंडी ठिकाणी द्रोण कॅमेराद्वारे टेहळणी केली जाणार आहे. तसेच धांगडधिंगा करणाऱ्यांवर आणि अंमली पदार्थ तस्करी, तसेच रेव्ह पार्ट्यावर रायगड पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रायगड जिल्हयातील समुद्र किनारपटटी असलेली ठिकाणे अलिबाग, मांडवा, काशीद, मुरूड, श्रीवर्धन, दिवे आगार, खालापुर व कर्जत तालुक्यातील फार्म हाउसेस, थंड हवेचे ठिकाण माथेरान या ठिकाणी ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागत साठी लाखो पर्यटक हे जिल्ह्यात दाखल होणार आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर राहणार आहे. 

गैरकृत्यांवर करडी नजर 

रायगड जिल्हयातील २८ पोलीस ठाण्यांकडे नववर्ष स्वागताच्या दृष्टीने विशेष पथक तयार करण्यात आलेली असुन हद्दीतील हॉटेल, धाबे, कॉटेजेस्, फार्म हाउस येथे गैरकृत्य होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. दारू पिवून धिंगाना घालणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, गैरवर्तन करणे यावर रोख लावण्याकरीता महत्वाच्या ठिकाणी पोलीस पथके नेमण्यात आलेली आहेत.

महिला सुरक्षेस बांधील 

महिला सुरक्षेस रायगड पोलीस बांधील असुन नववर्षाच्या स्वागताच्या दरम्यान 28 पोलीस ठाणे येथे साध्या गणवेशातील पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांचे पथक नेमण्यात येणार आहेत.

वाहतुक नियोजन 

वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी नागरीकांना वाहतुक कोंडीचा त्रास होवु नये याकरीता ८७ वाहतुक पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मद्यपान करून वाहन चालविणा-यावर चाप बसावे याकरीता १५ ब्रेथ अनालायझरचा वापर केला जाणार असुन मद्यपान करून वाहन चालविणा-या वाहन चालकांविरूध्द कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी द्रोण कॅमेरा महत्वाच्या ठिकाणी टेहळणी करणार आहेत. या कॅमेराला साऊंड सिस्टीम असून त्याद्वारे प्रवाशांना सूचना केल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

नाकाबंदी 

नववर्ष स्वागताकरीता आलेल्या नागरीकां विरूध्द कोणतीही अप्रिय घटना घडु नये याकरीता जिल्हयातील २८ पोलीस ठाणे हद्दीत ३८ नाकाबंदी पॉइंट, ११७ फिक्स पॉइंट आणि ११२ पेट्रोलिंग सेक्टर पद्धतीने बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक 

जिल्हयात नुकत्याच सापडलेल्या अंमली पदार्थाच्या पार्श्वभुमीवर नववर्षाच्या अनुषंगाने देखील रायगड जिल्हयात येणारी सर्व वाहने, फार्म हाउसेस, हॉटेल्स्, लॉजेस्, पाटर्यांची ठिकाणे, समुद्र किनारपट्टीची ठिकाणे येथे पोलीस ठाणेकडील साध्या वेशातील पथके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

लावण्यात येणारा बंदोबस्त 

नववर्षाच्या स्वागताच्या वेळी आनंद लुटण्याचा प्रत्येक नागरीकाला अधिकार आहे व कोणत्याही नागरीकांच्या आनंदावर विरजन पडु नये याकरीता रायगड पोलीसांनी कंबर कसली असुन जिल्हयात महत्वाच्या पोलीस अधिकारी अंमलदार बंदोबस्ताकरीता सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये १०९ पोलीस अधिकारी, ८७४ अंमलदार, ८७ वाहतूक पोलीस, २ आरसीपी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्हयातील त्याचप्रमाणे जिल्हयात येणा-या पर्यटकांच्या सुरक्षीततेसाठी सर्व खबरदारी घेत असुन नागरीकांनी देखील पोलीसांना सहकार्य करावे, संशयीत व्यक्तींवर नजर ठेवावी, आक्षेपार्ह वस्तु किंवा प्रकार आढळुन आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथे माहिती दयावी. सर्व नागकरीकांनी खबरदारी घ्यावी व पोलीसांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे व सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे. पोलीस नियंत्रण कक्ष ०२१४१ २२८४७३, ७४४७७११११०, पोलीस हेल्पलाईन क्रमांक :- ११२ या नंबरवर काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.

Web Title: Raigad Police Force ready to welcome New Year; Surveillance through drone cameras for the first time to solve traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.