दुसऱ्यांदा चॅम्पियन! ४८ वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मानकरी ठरले रायगड पोलीस दल
By राजेश भोस्तेकर | Published: November 25, 2023 07:06 PM2023-11-25T19:06:13+5:302023-11-25T19:06:31+5:30
४८ वी परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ खेळविण्याचा मान यंदा रायगडला मिळाला होता.
अलिबाग : ४८ वी कोकण परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ स्पर्धेत रायगड पोलीस दल चॅम्पियन ठरला आहे. रायगड पोलीस दलाने सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन चषकावर आपले नाव कोरले. विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते रायगड पोलीस दलातील खेळाडूने चॅम्पियन चषक स्वीकारला. सांघिक खेळातही रायगड पोलीस दलाने उत्तम कामगिरी करून सर्वाधिक चषक जिंकले. नवी मुंबई द्वितीय तर रत्नागिरी पोलीस दल हे तिसऱ्या स्थानी राहिले.
४८ वी परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ खेळविण्याचा मान यंदा रायगडला मिळाला होता. २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. २५ नोव्हेंबर रोजी समारोप समारंभ विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. मीरा भाईंदर अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नवी मुंबई उपयुक्त संजय पाटील, पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी, खेळाडू यावेळी उपस्थित होते.
रायगड पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडूंनी यावेळी प्रत्येक सांघिक, वयक्तिक खेळात आपले कौशल्य दाखविले. त्यामुळे पहिल्यापासून रायगड पोलीस दल हे गुणांकनमध्ये अव्वल राहिले. त्यामुळे चॅम्पियन चषकावर रायगड पोलीस दलाने सलग दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. गतवर्षी सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या स्पर्धेत ही रायगड हा अव्वल ठरला होता. रायगडसह, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या पोलीस दलातील ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.
रायगड पोलीस दल हा अव्वल ठरला असून द्वितीय स्थानी नवीमुंबई तर तृतीय स्थानी रत्नागिरी पोलीस दल राहिले आहे. वयक्तिक गुणांकनमध्ये पुरुष गटाचा पालघर संघाचा खेळाडू आफताब खुदबुद्दीन सय्यद तर रत्नागिरी संघाची महिलामध्ये शितल संभाजी पिंजरे हे दोन्ही खेळाडू बेस्ट अथलीट ठरले. या दोन्ही स्पर्धकांना दुचाकी भेट देण्यात आली. समारोप समारंभ वेळी पोलीस आणि मान्यवर यांची रस्सी खेच स्पर्धा खेळविण्यात आली. आमदार अनिकेत तटकरे यांच्या संघाने यात बाजी मारली. रायगडाला अव्वल स्थान मिळाल्यानंतर रायगड पोलीस संघाने जल्लोष साजरा केला.