बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरणात रायगडचा पोलिस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:08 AM2023-04-29T07:08:28+5:302023-04-29T07:08:43+5:30
भरती प्रक्रिया; गडचिरोली पोलिसांकडून सिद्धेश पाटीलला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत काही उमेदवारांनी खोटे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात रायगड पोलिस दलातील पोलिस शिपाई सिद्धेश पाटील याने हे बोगस दाखले दिले असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी अलिबागमधून सिद्धेश पाटीलला अटक केली.
सिद्धेशने त्याच्या साथीदाराच्या सोबतीने किती जणांना दाखले दिले, याचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या २०२३ च्या पोलिस भरतीदरम्यान काही उमेदवार प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र घेऊन भरतीसाठी आले होते, अशी माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे विभागाने तपास करून त्या भरतीच्या उमेदवाराविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
बोगस प्रमाणपत्र गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सात आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत सिद्धेश पाटील (नेमणूक : पोलिस मुख्यालय, प्रतिनियुक्ती- पैरवी अधिकारी, अलिबाग, सेशन कोर्ट) याने संबंधित भरतीच्या उमेदवारांना प्रकल्पाग्रस्तांचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गडचिरोली पोलिस दलाचे पथक शुक्रवारी अलिबाग येथे आले होते. सिद्धेश पाटील याने त्या उमेदवारांना त्याचा साथीदार देशमुख (रा. सांगली) याच्या मदतीने प्रकल्पातग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र बीड जिल्ह्यातून आणून दिल्याचे कबूल केले.
सात वर्षांपूर्वी झाला होता भरती
सिद्धेश पाटील हा अलिबाग तालुक्यातील असून, सात वर्षांपूर्वी रायगड पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्याने प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला जोडला होता; मात्र मिळालेल्या माहितीनुसार पाटील हा प्रकल्पग्रस्त नसल्याचे कळते. त्याचा दाखलाही बोगस असल्याची शक्यता आहे.