बेपत्ता झालेल्या दोन्ही युवती शोधण्यात रायगड पोलिसांना यश
By निखिल म्हात्रे | Published: November 10, 2023 09:37 PM2023-11-10T21:37:19+5:302023-11-10T21:37:31+5:30
अलिबाग - नोकरीच्या अमिषाला बळी पडून घरातून बाहेर पडलेल्या दोन तरुणी देशाबाहेर जाणार होत्या. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...
अलिबाग - नोकरीच्या अमिषाला बळी पडून घरातून बाहेर पडलेल्या दोन तरुणी देशाबाहेर जाणार होत्या. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने या बेपत्ता तरुणीचा शोध घेत गुजरातमधून त्यांना सुखरूप आणून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अठरा व एकोणीस वर्षीय दोन मैत्रीणींची सोशल मिडीयामार्फत एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्या माध्यमातून त्यांची ओळख वाढली. आपल्या जाळ्यात तरुणी अडकल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्यांना नोकरीचे अमिष दाखवले. त्याच्या अमिषाला बळी पडून रात्री या दोघी घर सोडून गेल्या.
मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी अलिबाग पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडे दिला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथक तयार करण्यात आले. वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेण्यात आली. पुणे व गुजरातमध्ये पथक पाठविण्यात आले. त्यावेळी या दोघी गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील एका घरात दिसून आल्या. या दोघींना ताब्यात घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. त्या तरुणींना नोकरी देण्याच्या बहाण्याने विदेशात पाठविण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र पोलीसांच्या सतर्कतेमुळेे हा त्याचा डाव हाणून पाडला.
बेपत्ता तरुणींना विदेशात जाऊन नोकरी करण्याची इच्छा होती. सोशल मिडीयावर गेल्या चार महिन्यापूर्वी त्या तरुणासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले होते. त्यामुळे त्यांनी बाहेरच्या ठिकाणी नोकरीला जाण्याची तयारी केली. त्यानुसार 6 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सर्वजण साखरझोपेत असताना दोघीजणी घरातून बाहेर पडल्या. कल्याण, पनवेलमार्गे गुजरात न जाता, पुणे मार्गे त्या गुजरातला गेल्या. तांत्रिक बाबीद्वारे त्यांचा शोध घेण्यात यश आले. मात्र या प्रकरणाबाबत आणखी वेगळ्या मार्गाने पोलीस तपास करीत आहेत.
रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करून गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस हवालदार प्रतीक सावंत, विलास आंबेटकर, आदीच्या पथकाने यशस्वीरित्या तपास पूर्ण केले.