- मधुकर ठाकूरउरण - येथील ग्लोबिकाँन टर्मिनल कंपनीकडून शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.तसेच नाशवंत मालाची विल्हेवाट लावण्याऐवजी मिळेल त्या ठिकाणी टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरते.हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना मात्र तक्रारीनंतरही महसूल आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त आहेत.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारवाईसाठी आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांनाच साकडे घातले आहे.
उरण तालुक्यातील कोप्रोली,पिरकोन व खोपटा -बांधपाडा या तीन ग्रामपंचायत हद्दीत ग्लोबिकाँन कंटेनर टर्मिनल आहे. या कंटेनर टर्मिनलमध्ये विविध प्रकारच्या मालाची मोठ्या प्रमाणावर हाताळणी केली जाते.मात्र या कंटेनर गोदामातून रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने येथील खाडीत सोडण्यात येत आहे.कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता रासायनिक मिश्रित दुषित पाणी थेट शेत जमिनी आणि खाडीत सोडण्यात येत असल्याने वारंवार खाडीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.त्याशिवाय नाशवंत मालाची विल्हेवाटही खाडीकिनाऱ्या परिसरात टाकून करीत आहेत.त्यामुळे खोपटा - कोप्रोली परिसरात पसरणाऱ्या नाशवंत मालाच्या उग्र वासाच्या भयानक दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
याप्रकरणी ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी ग्लोबिकाँन टर्मिनलच्या विरोधात वारंवार उरण तहसीलदार, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तक्रारी केल्या आहेत.मात्र त्याकडे महसूल व प्रदुषण विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने काणाडोळाच केला जात आहे.तक्रारीनंतर काही वेळा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फायद्यासाठी थातुरमातुर पाहणी, पंचनामे करून नोटीसही बजाविण्याची दिखाऊ कारवाईही करतात. मात्र हजारो नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेला प्रश्न निकाली निघत नसल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. याप्रकरणी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
याप्रकरणी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधुनही विभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी प्रतिसाद दिला नाही.
शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडतात.तसेच दुषित पाणी सोडून शेतजमिनीत नापीक करून स्वस्तात विकत घेण्यासाठी कंपनी व भांडवलदारांनी रचलेला हा कट असल्याचा गंभीर आरोप किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी केला आहे.