मधुकर ठाकूर, उरण: वाढती महागाई व वाढती बेरोजगारी यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात माकपच्या विविध संघटनांच्या वतीने बुधवारी (२१) उरण तहसील कार्यालयावरच मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी मोर्चेकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सीआयटीयु, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना, किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला उरण-चारफाटा येथून सुरुवात झाली. महागाई कमी करा, बेरोजगारांना रोजगार द्या, महागाई वाढविणारे केंद्र व राज्य सरकार चले जाव आदी केंद्र सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत हा मोर्चा उरण तहसील कार्यालयावरच पोहचला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी कामगार नेते भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील, अमिता ठाकूर,कुसूम ठाकूर, माकपचे जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे, किसान सभेचे संजय ठाकूर यांनी सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनपर केलेल्या भाषणातून वक्त्यांनी राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेची अन्न सुरक्षा नष्ट करण्यासाठी सुरू केलेली कारवाई त्वरित थांबवून केवळ करपात्र कुटुंबाचे रेशनिंग बंद करावी, स्वस्त धान्य दुकानातून साखर,तेल,डाळी सारख्या इतर जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी,उरण-पनवेल रस्त्यावरील नादुरुस्त पूल दुरुस्त करा, उरणमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजवा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आदी मागण्याही करण्यात आल्या,
उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी मोर्चाला सामोरे येत मोर्चेकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील पाटील आदी उपस्थित होते.