- निखिल म्हात्रे अलिबाग - सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र या पहिल्याच दिवशी या अभियानात रायगड जिल्ह्यातील बोर्ली मोरापाडा येथे डमी अतिरेकी यांना पकडुन सागरी सुरक्षा कवच अभियान यशस्वी करण्यात आले.
सागरी सुरक्षा कवच अभियानाचे आयोजन हे पोलिस विभाग, भारतीय तटरक्षक रक्षक दल, भारतीय नौदल यांच्यासहित इतर गृह विभागाच्या सहकार्याने करण्यात आले असेल तरी या अभियानात सागर सुरक्षा रक्षक दलातील सदस्य यांना सहभागी करून घेतले जाते. या अभियान दरम्यान रायगड जिल्ह्यातील नाक्यानाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो.
सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई येथे २६ /११ चा हल्ला देखील समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश मिळवुन केला होता
पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित सागर सुरक्षा कवच अभियान राबविण्यात आले होते. या अभियाना दोन सीएफएसआय दलाचे दोन कर्मचारी, पोलिस विभागातील दोन कर्मचारी, भारतीय तटरक्षक दलाचा एक जवान, तर एक नौदल विभागाचा एक जवान असे सहा जणांना भारतीय तटरक्षक दलाने डमी अतिरेकी समुद्रात पाठविण्यात आले होते.
सागर सुरक्षा कवच अभियान सुरू होण्यापूर्वी हे डमी अतिरेकी हे 16 नोव्हेबर 2023 रोजी पहाटे दीड वाजता समुद्रात बोट घेवुन गेले होते. हे अतिरेकी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुरुड तालुक्यातील बोर्ली गावातील मोरापाडा येथे बोटी मधून उतरत असताना रात्री सुरक्षेसाठी कार्यरत असणारे सहायक फौजदार सुधाकर पाटील, पोलिस नाईक घासे, सुरक्षा रक्षक, सागरी सुरक्षा दलाचे सदस्य अमुल कुमार जैन, अंजुम सुभेदार यांनी त्या अतिरेकी यांना अडवून त्यांची सखोल चौकशी केली असतां त्यांना डमी अतिरेकी म्हणून पाठवणी करण्यात आले होते.