Raigad: उरणमध्ये पावसामुळे गोविंदा पथकांचा आनंद द्विगुणित: दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:10 PM2023-09-07T17:10:53+5:302023-09-07T17:11:11+5:30
Raigad: दीड- दोन महिनाभराच्या विश्रांतीनंतर ऐन गोपाळकाला उत्साहातच मुसळधार पावसाने सकाळ पासूनच हजेरी लावली. त्यामुळे गोविंदा पथके आणि बाळगोपाळांच्या उत्साहाला आणखीनच भरते आले.
- मधुकर ठाकूर
उरण - दीड- दोन महिनाभराच्या विश्रांतीनंतर ऐन गोपाळकाला उत्साहातच मुसळधार पावसाने सकाळ पासूनच हजेरी लावली. त्यामुळे गोविंदा पथके आणि बाळगोपाळांच्या उत्साहाला आणखीनच भरते आले. धाकमाकुम धाकमाकुमच्या आणि बोल बजरंग बलीचा घोष करीत अनेक गोविंदा पथकांनी थरावर थर लावून दहिहंडी फोडून उत्साही वातावरणात उरण परिसरात ठिकठिकाणी गोपाळकाला सण साजरा केला.
उरणमधील विविध गोविंदा पथके सकाळपासूनच लाखाच्या दहिहंडी फोडण्यासाठी उत्सुक होते. शहरातील विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संस्थेने उभारलेल्या दहीहंड्यांना सलामी देण्यासाठी गोविंदा पथके गुंतले होते.त्यातच दीड- दोन महिनाभराच्या विश्रांतीनंतर ऐन गोपाळकालात मुसळधार पावसाने सकाळ पासूनच हजेरी लावल्याने गोविंदाचा आनंद व्दिगुणित झाला होता.अनेक गोविंदा पथकांनी उरण नगर परिषदेच्या मराठी शाळेतील प्रांगणात भाजपाने आणि राष्ट्रवादीने उभारलेल्या दहीहंड्यांना सहा- सात थर लावून सलामी दिली.उरण परिसरातील असलेल्या लाखांच्या सार्वजनिक दहीहंड्या संध्याकाळपर्यंत तरी फुटल्या नव्हत्या.
चिरनेरच्या कातळपाडा येथील बाल गोपाळ मित्र मंडळ गोविंदा पथकाच्या वतीने यावर्षी प्रथमच दहीहंडीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. डीजेच्या तालावर दहीहंडी फोडण्याच्या कसरती करत बच्चे कंपनीने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.