Raigad Rain: उच्चदाबाच्या वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळले; महाड, पोलादपूर तालुक्यातील 260 गावे अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 08:58 PM2021-07-23T20:58:03+5:302021-07-23T20:59:01+5:30
Raigad 80000 customers electricity gone: महापारेषणच्या महाड अति उच्चदाब उपकेंद्र बंद असल्यामुळे महावितरणच्या पेण मंडळातील चांभारखिंड, जी. बी. एल, कोलोसे व तुर्भे हे चार स्विचिंग उपकेंद्र बंद पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड: जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे गुरुवारी 22 जुलै 2021 राेजी महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महावितरणच्या गोरेगाव विभागातील महाड व पोलादपूर उपविभाग पूर्णपणे अंधारात गेला आहे. दोन्ही तालुक्यात 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. अति उच्चदाब टॉवरच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. टॉवर लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वेळ लागणार असल्याची माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी दिली. (Two towers of high voltage electricity collpsed in Raigad.)
महापारेषणच्या महाड अति उच्चदाब उपकेंद्र बंद असल्यामुळे महावितरणच्या पेण मंडळातील चांभारखिंड, जी. बी. एल, कोलोसे व तुर्भे हे चार स्विचिंग उपकेंद्र बंद पडले आहेत. परिणामी, महाड व पोलादपूर येथील महाड शहर, बिरवाडी, विन्हेरे, वहूर, नाते, नांगळवाडी, नागाव, कुंबळे व महाड एम. आय. डी. सी तसेच पोलादपूर शहर, तुर्भे, पितळवाडी, वरंध असे एकूण 260 गावांचा वीजपुरवठा बाधित झाला असून यामध्ये ४४ उच्चदाब २२ के.व्ही फीडर व 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा टॉवर कोसळल्यामुळे खंडित झाला आहे.