अलिबाग : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. गेल्या २४ तासांत ५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांचे आणि आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणच्या नुकसानीची आकडेवारी घेण्यास सुरुवात केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.मंगळवारी दुपारनंतर आकाशात ढग दाटून काळोख पसरला. अधूनमधून विजेचा गडगडाट होत होता. त्यानंतर पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. महाड तालुक्यातील काकरतळे येथे चार घरांवर वीज कोसळली, त्याचप्रमाणे एका गोठ्याचेही नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यातही पावसाने प्रचंड धुमाकूळ घालत साई मंदिर परिसरातील एक वृक्ष कोसळले. यामध्येही कोणतीही हानी झाली नसली तरी, सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.पावसाची बरसात होत असतानाच काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू होता. गेल्या चार महिन्यांत पाच वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा आणि काजू पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ४० टक्केच उत्पादन होणार असल्याचे आंबा बागायतदार शेतकरी डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.आंब्याचे फळ तयार झाल्यावर पावसाचा त्यावर विशेष परिणाम होत नाही. मात्र वादळी वाऱ्यासह मंगळवारी झालेल्या पावसाने आंबा गळतीचे प्रमाण वाढले, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
रायगडात पावसाचे थैमान
By admin | Published: May 06, 2015 11:30 PM