- मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर-उरण येथील शेतघराच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या सात फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगराची फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी शिताफीने मुक्तता करुन जंगलात सोडून दिले.
चिरनेर -उरण गावचे रहिवासी असलेल्या कमळाकर ठाकूर यांच्या शेतघराच्या सभोवार संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात शुक्रवारी (२६ ) सकाळच्या सुमारास एक सात फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा अजगर अडकून पडला होता.
जाळ्यात अडकलेल्या अजगराची सुटका करून घेण्यासाठी सुरू असलेली व्यर्थ धडपड कमळावर ठाकूर यांच्या नजरेस आल्यानंतर त्यांनी लागलीच सर्पमित्रांना पाचारण केले.
फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे उपाध्यक्ष राजेश पाटील व सर्पमित्र मोहन पाटील यांनी सुरी,चाकूने मोठ्या प्रयासाने जाळी कापली आणि शिताफीने जाळ्यात अडकलेल्या अजगराची मुक्तता केली.त्यानंतर सात फुटी लांबीच्या अजगराला नैसर्गिक आवासात सोडून दिले.