Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे
By राजेश भोस्तेकर | Published: October 1, 2023 01:58 PM2023-10-01T13:58:56+5:302023-10-01T13:59:25+5:30
Raigad News: रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अफगाण प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढळून आली.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अफगाण प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढळून आली. यानंतर डॉ. भरत बास्टेवाड यांनी जागृतता दाखवित पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यानंतर ही चरसची पाकिटे असल्याचे स्पष्ट केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. स्वच्छता मोहिम सुरू असताना समुद्रकिनारी असणाऱ्या कचऱ्यात एका छोटी गोणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या नजरेस पडली. ही गोणी त्यांनी कचऱ्यातून बाहेर काढली असता, त्यामध्ये अफगान प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे दिसून आली. मागील काही दिवसांत रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारी अशी पाकिटे सापडली होती. त्यामध्ये चरस हा अमली पदार्थ असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ही बाब लक्षात घेत डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासोबत संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी धाव घेत, सदर पाकिटे चरसची असल्याचे स्पष्ट करीत, तातडीने पंचनामा करून परिसरात शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशाच प्रकारच्या पिशव्या गेल्या महिन्यात रायगड किनाऱ्यावर सापडल्या असून, तब्बल साडेआठ कोटींचा चरस हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे अशी माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी पंचनामा करीत सदर पाकिटे जप्त केली आहेत.