- अलिबाग - यंदा शिवसेना आणि शिंदे गट यांचा दसरा मेळावा मुंबई येथे होत आहे. शिवसेना फुटीनंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. अलिबाग मधून शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते हे बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहे. कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी नेण्याआणण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातून २५ हजारहून अधिक शिंदे समर्थक मेळाव्याला गेले असल्याचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष फुटून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट निर्माण झाला आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात दोन्ही गट हे आपली ताकद दाखविणार आहेत. दसरा मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थिती दिसावी यासाठी शिंदे गटाने जिल्ह्यात बैठका घेतल्या होत्या. पंधरा दिवसांपासून दसरा मेळाव्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत होती. शिंदे समर्थकांना मेळावा ठिकाणी नेण्यासाठी वाहनाची, खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
अलिबाग तालुक्यातून हजारो शिंदे समर्थक हे मुंबईकडे बसने रवाना झाले आहेत. तालुक्यातून ठिकठिकाणाहून समर्थकांना वाहनांची सुविधा करण्यात आलेली होती. वाहनात खाण्या पिण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातून पंचवीस हजार समर्थक हे रवाना झाले असल्याचे जिल्हाप्रमुख केणी यांनी सांगितले आहे.