फणसाडमध्ये घडले रानकुत्र्यांचे दर्शन, वनविभागाने लावलेल्या ट्रॅपमध्ये कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:30 PM2024-04-06T12:30:20+5:302024-04-06T12:30:49+5:30
Raigad News: रायगडमधील फणसाड अभयारण्यात श्वान कुळातील दुर्मीळ असलेल्या रानकुत्र्यांचे प्रथमच दर्शन झाले आहे. यापूर्वी २०२० मध्ये पाऊलखुणा आढळल्या होत्या. पण आता प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी सांगितले.
मुरूड जंजिरा - रायगडमधील फणसाड अभयारण्यात श्वान कुळातील दुर्मीळ असलेल्या रानकुत्र्यांचे प्रथमच दर्शन झाले आहे. यापूर्वी २०२० मध्ये पाऊलखुणा आढळल्या होत्या. पण आता प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी सांगितले.
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे ५४ चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेले असून, जैवविविधतेने नटलेले आहे. अभयारण्यात जवळपास २५ ठिकाणी पाणवठे असल्याने मुबलक पाणी असल्याने वन्यसंपदेबरोबरच वन्यजीवांना वावर दिवसेंदिवस वाढत आहे. २०२० पासून येथे रानगव्यांची संख्या वाढली असून, सध्या २० पेक्षा अधिक रानगवे आहेत. याशिवाय दुर्मिळ रानकुत्र्यांची संख्याही वाढल्याचे दिसून येत आहे. रानससा, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हा हे वन्यप्राणी अभयारण्यात नियमित आढळतात.
अभयारण्य क्षेत्रात ‘कॅमेरा ट्रॅप’ लावण्यात आले होते. यात दोनवेळा रानकुत्र्यांचे छायाचित्र टिपण्यात आली आहेत. शिवाय पाणवठ्यावरही ठसे आढळले आहेत. त्याचप्रमाणे फणसाड मधील मनोऱ्यावरून निरीक्षण करताना दोन रानकुत्रे आढळून आले. एका कॅमेऱ्याने रानकुत्रा टिपता आला, तर दुसरा पळाल्याची माहिती काळभोर यांनी दिली.
संख्या किती याचा शोध सुरू
रानकुत्र्यांची क्रूर शिकारी गणना केली असून, ती कळपाने राहतात. मात्र फणसाड मध्ये दोन रानकुत्री आढळली आहेत. त्यामुळे आणखी रानकुत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची संख्या किती आहे, याचा शोध घेण्याचे काम सूर आहे. यासाठी फणसाड अभयारण्यात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे यांची संख्या वाढविली आहे.