Raigad: अखेर अलिबाग शहरात सिग्नलचे दिवे पेटले
By राजेश भोस्तेकर | Published: December 29, 2022 07:18 PM2022-12-29T19:18:51+5:302022-12-29T19:19:36+5:30
Raigad News: अलिबाग शहरात बंद असलेली सिग्नल यंत्रणा वर्षाच्या पूर्व संध्येला सुरू करून अलिबाग नगरपरिषदेने नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. नव वर्षाला पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळे होणारी कोंडी सुटावी यासाठी ही यंत्रणा गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - अलिबाग शहरात बंद असलेली सिग्नल यंत्रणा वर्षाच्या पूर्व संध्येला सुरू करून अलिबाग नगरपरिषदेने नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. नव वर्षाला पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळे होणारी कोंडी सुटावी यासाठी ही यंत्रणा गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना सिग्नलचे नियम पाळून वाहने चालवावी लागणार आहेत. अन्यथा पोलिसांकडून दंड कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
अलिबाग शहर हे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. यासाठी अलिबाग नगरपरिषदेने महावीर चौक आणि अशोका कॉम्प्लेक्स या ठिकाणी पाच सहा वर्षापूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. मात्र थोडेच दिवस ही यंत्रणा सुरू होती. त्यानंतर ती बंद अवस्थेत होती. सिग्नल यंत्रणेवर लाखोंचा खर्च केला होता. मात्र गेली पाच सहा वर्ष ही यंत्रणा बंद पडली होती.
नव वर्षाला मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबाग मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेने बंद अवस्थेत असलेली महावीर चौकातील सिग्नल यंत्रणा गुरुवारी कार्यान्वित केली आहे. तर अशोका कॉम्प्लेक्स येथील यंत्रणा अद्याप बंद आहे. सिग्नल सुरू झाल्याने वाहन चालकांना शिस्त लागणार आहे. मात्र अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला उभी करणाऱ्या वाहनाचा प्रश्नही सुटणे आवश्यक आहे. अन्यथा सिग्नल सुरू होऊनही वाहतूक कोंडी समस्या मात्र जैसे थी राहण्याची शक्यता आहे.