राजेश भोस्तेकर, अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने नदी, खाडी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्यास प्रशासनाने सांगितले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी हा सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळच्या वेळेस ही पावसाने सुरुवात केल्याने नोकरदार वर्गाला पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने पाणीच पाणी रस्त्यावर साचलेले आहे. त्यामुळे चालकांना पाण्यातून वाहने काढावी लागत आहेत.
पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले असल्याने एक दोन दिवसात खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या इशारा मुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे.