- मधुकर ठाकूर उरण - धुतूम अंडरपास रस्त्यावरच रविवारी चार वाजताच्या सुमारास पुन्हा ४० फुटी कंटेनर ट्रेलर् पलटी झाला आहे.यामुळे या गावाकडे येजा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली असल्याने ' रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच अवस्था झाली असल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त झाले आहेत.
धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पळस्पा- जेएनपीए एनएच-४ बी दरम्यान नागरिकांच्या दळणवळणाची व्यवस्था म्हणून चार वर्षांपूर्वी अंडरपास आणि सर्व्हिस रोड तयार केला आहे. धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेला सर्व्हिसरोड आणि अंडरपास रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे.अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दुचाकी, चारचाकी आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्याशिवाय या अंडरपास आणि सर्व्हिस रोडवरुनदिवस रात्र मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे.अंडरपास रस्ता दररोज अपघातांनाही निमंत्रण देणारा ठरत असल्याने अपघाताची संख्या वाढतच चालली आहे.
या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे अंडरपास आणि सर्व्हिस रोड धुतुम रहिवाशांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.याबाबत उपाययोजना करण्यासाठी धुतुम ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अंडरपास रस्त्याच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी केली आहे.मात्र त्याची पुर्तता अद्यापही झालेली नाही.
रविवारी (१७) संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास पुन्हा ४० फुटी कंटेनर ट्रेलर् पलटी झाला आहे.यामुळे या गावाकडे येजा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली असल्याने ' रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच अवस्था झाली असल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त झाले आहेत.दरम्यान अंडरपास रस्त्यावरच पटली झालेला ४० फुटी कंटेनर ट्रेलर् काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.