Raigad: चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांचा चिरनेरच्या युवा गस्ती पथकाकडून फिल्मी स्टाईलने पाठलाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:04 PM2024-01-18T23:04:19+5:302024-01-18T23:04:29+5:30
Raigad Crime News: अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले.
- मधुकर ठाकूर
उरण - अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र आलेले चोरटे चारचाकीतुन पसार होण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांसह स्थानिक तरुणांच्या गस्ती पथक तैनात असतानाही चिरनेरमध्ये घुसलेल्या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसांपासून उरण परिसरातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये भुरट्या चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे.पोलिसांनाही चोरांना आवर घालण्यात यश आले नाही.यामुळे चिरनेरमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी तरुणांची गस्ती पथके तयार केली आहेत.ही गस्ती पथके रात्रभर गावभर गस्त घालत आहेत.गुरुवारी (१८) पोलिस, युवकांची गस्त सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास अचानक चिरनेर गावातील बत्तीस गुल झाली.यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने चोरटे गावात शिरले.चोरट्यांच्या हालचालींची माहिती मिळताच तरुणांच्या गस्ती पथकाने आपला मोर्चा चोरट्यांकडे वळविला.मात्र चोरट्यांना गस्ती पथकाच्या हालचालींचा अंदाज आला.त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन चिरनेर गावातून काढता पाय घेतला.युवक सदस्य असलेल्या गस्ती पथकातील काही निडर तरुणांना एका चारचाकीतुन पनवेलच्या दिशेने चोरटे पसार होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दुचाकीवरून त्यांचा १५ किमी अंतरापर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.मात्र स्पीड ब्रेकरवरुनही भरधाव वेगाने चारचाकी चालवत चोरटे पलायन करण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेऊन उध्दव ठाकरे गटाचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, तंटामुक्तीचे गाव अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान ठाकूर, शिवसेनेचे तेजस ठाकूर तसेच चिरनेर गावातील अन्य कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाणे गाठले . पोलिस निरीक्षक (गुन्हे) कांबळे यांच्याशी याबाबत चर्चा करून गावकऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी चिरनेर गावकऱ्यांच्या वतीने केली.यावेळी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यासाठी पोलिस बळ वाढविण्याचे तसेच गावात रात्री गाव बैठका घेण्यात आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.