विशेष प्रतिनिधी अलिबाग : ख्रिसमस आणि सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्याच्या रेवस-मांडवा-सासवने-किहिम-थळ-वरसोली-अलिबाग-आक्षी-नागाव-पालव-चौल-रेवदंडा-बारशिव-काशिद-नांदगाव-मुरूड-दिवेआगर-श्रीवर्धन या किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आणि घरगुती निवारे हाउसफुल्ल झाले. रविवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील किनारपट्टीतील छोट्या-मोठ्या हॉटेल्ससह रिसॉर्ट आणि घरगुती निवाºयांमध्ये दाखल पर्यटकांची संख्या दहा लाखांच्या वर गेल्याची माहिती किनारपट्टीतील विविध हॉटेल व्यावसायिक व पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला असता ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.मुंबई नगरीस अगदी खेटून असलेल्या आणि समुद्रमार्गे केवळ ४० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मांडवा जेट्टीवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक मांडवा, सासवने, थळ, अलिबाग परिसरात आले आहेत. मांडवा परिसरात ५२ नोंदणीकृत हॉटेल्स व रिसॉर्ट असून ते पूर्णपणे हाउसफुल्ल झाले आहेत. मांडवा परिसरात रविवारी सर्वाधिक सुमारे १ लाख ७५ हजार पर्यटक संख्येची नोंद झाल्याचे मांडवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी सांगितले. तर अलिबाग शहर परिसरातील ४ हजार ५०० हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांमध्ये पर्यटक दाखल झाले असून ५० हजार मुक्कामी तर तितकेच पर्यटक सकाळी येऊन संध्याकाळी मुंबईस परतत अशा एक लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी अलिबागला हजेरी लावल्याचे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.मुरूड तालुक्यातील काशिद येथे ९०, मुरूड येथे ४०, नांदगाव येथे ३५ हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवारे असून खासगी फार्महाउस ७० आहेत. या सर्व ठिकाणी पर्यटकांची तुडुंब गर्दी आहे. रविवारी सुमारे ४० हजार पर्यटक मुक्कामी तर सुमारे ५० ते ६० हजार पर्यटक दिवभराच्या पर्यटनार्थ आल्याचे मुरूडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले.रेवदंडा परिसरात सुमारे ८० हॉटेल्स, रिसॉर्ट व पर्यटक निवारे असून सुमारे ६० हजार पर्यटकांनी हजेरी लावली असल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांनी दिली आहे. श्रीवर्धनमधील ८० नोंदणीकृत हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांमध्ये ३ हजार पर्यटक मुक्कामी असून दिवसभरात सुमारे ४० हजार पर्यटक पर्यटनार्थ आल्याचे श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच तरुणाई आणि पर्यटकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी तरुणाईत, पर्यटकांमध्ये पार्टी, नाचगाण्यावर थिरकण्याचे बेतही आखले जात आहेत.>किल्ला पाहण्यासाठी मुरूडमध्ये पर्यटकांची गर्दीनांदगाव/ मुरूड : जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी नाताळ सणाच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी सकाळपासूनच तुफान गर्दी केली होती. उंद्रे हायस्कूलपर्यंत ते राजपुरी जेट्टीपर्यंत लांबच लांब रांगा दिसून आल्या. तिकीट खिडकीवर पर्यटकांची झुंबड दिसून आली. खोरा बंदरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत पर्यटक मौजमजा करताना दिसून येत आहेत. मात्र शनिवारी एक ा पर्यटक महिलेला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शनिवारी २३ डिसेंबर रोजी नाशिक येथील पर्यटक महिला गंगोत्री देवी (५५) या जंजिरा किल्ल्यावरून परतत असताना त्यांचा अपघात होऊन छातीची बरगडी फ्रॅक्चर झाल्या. जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून होडीत बसताना पाय घसरून त्या होडीच्या मधोमध पडल्याने छातीची बरगडी फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास येत आहे.>मुंबई-पुणे मार्गावर वाहतूककोंडीरायगडच्या किनारपट्टीतील हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांचे आगाऊ बुकिंग गेल्या महिन्यापूर्वीच झाले असल्याने आयत्या वेळी आलेल्या पर्यटकांची मोठीच पंचाईत झाली होती.रविवारी अलिबागमध्ये काही पर्यटकांना अलिबाग बस स्थानकात बसून रात्र काढावी लागली तर काहींनी शहरातील नागरिकांना विनंती करून घराच्या व्हरांड्यात रात्र काढण्याचा निर्णय घेतला.अलिबाग, मुरूड, काशिद, रेवदंडा, नागाव परिसरातील हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवारे फुल्ल झाले असल्याने आपापल्या चारचाकी वाहनातून आलेल्या पर्यटकांनी संध्याकाळीच मुंबई-पुण्यास जाण्याचा निर्णय घेतला, परिणामी या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. वडखळ ते अलिबाग या केवळ २० ते २५ मिनिटांच्या प्रवासाकरिता तब्बल एक ते दीड तास लागत होता.
सलग सुट्ट्यांमुळे रायगड पर्यटकांनी फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:31 AM