- निखिल म्हात्रेअलिबाग - उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी पाण्यात पोहोचण्याचा आनंद पर्यटक अधिक घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे तसेच येथील मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्रे पर्यटकांच्या कायमच पसंतीस उतरली आहेत. यंदा देखील पर्यटकांनी उन्हाळी सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी जिल्ह्याला पसंती दिली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी पडली आहे. त्यात शनिवार व रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यासह इतर राज्य, देश-विदेशातील पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने काही पर्यटक शुक्रवारी सायंकाळी, तर काही पर्यटक शनिवारी सकाळी जिल्ह्यात आले. अलिबागसह नागाव, वरसोली, काशीद, मुरूडसारख्या अनेक समुद्रकिनाऱ्यांमध्ये जाऊन पाण्यात पोहण्याचा आनंद त्यांनी लुटला. काही पर्यटक बनाना राईड्स, तर काही पर्यटकांनी बोटींमधून प्रवास करीत समुद्र सफरीचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी समुद्रकिनारी असलेले सायकल, उंटावरील सवारी घेत मौजमजा केली. काही जण आपल्या मित्रांसमवेत, तर काही कुटुंबियांसमवेत समुद्रकिनारी फिरण्यास आल्याचे दिसून आले. यामध्ये तरुण पर्यटकांचा अधिक उत्साह असल्याचे दिसून आले. यामुळे पर्यटनावरुन अवलंबून असलेले हॉटेल व लॉज व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या खूप चलती आहे. स्थानिकांना रोजगार पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्याने स्थानिक व्यवसायिकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांना यातून उभारी मिळत आहे. सध्या उष्णता जाणवत आहे. यातून सुटका घेण्यासाठी काही पर्यटकांनी नारळ पाणी पिण्यावर अधिक भर दिला.
बाप्पाच्या दारी भक्तांची मांदियाळी अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे, खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर. सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याचे दिसून येत आहे.
जंजिरा, कुलाबा किल्ल्याला भेट मुरुड आणि अलिबाग समुद्र किनाऱ्याची मजा लुटतानाच पर्यटक येथे असलेल्या मुरुड जंजिरा आणि कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत. तिथला इतिहास जाणून घेत आहेत. ओहोटीच्या वेळी कुलाबा किल्ल्यावर चालत किंवा घोडागाडीने जाता येते. तर, जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी फेरीबोटींच्या फेन्या सुरु असतात. किल्ल्याची माहिती देण्यासाठी याठिकाणी गाईडसुद्धा उपलब्ध आहेत.