- मधुकर ठाकूर उरण : बीपरजॉय चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगड परिसराला धडकणार नसला तरी सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावातील नागरिक, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.खराब हवामान आणि समुद्रात मागील पाचसहा दिवसांपासून समुद्रात उसळलेल्या भयानक उंचीच्या लाटांमुळे सागरी मार्ग धोकादायक बनले आहेत.बिपरजॉयच्या संभाव्य भीतीने परिसरातील किनारपट्टीच भयग्रस्त, अस्वस्थ बनली आहे.
बीपरजॉय चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगड पासून शेकडो किलोमीटर अंतरावर आहे.गुजरातच्या दिशेने १३५-१४५ किमी इतक्या प्रचंड वेगाने धावणाऱ्या बीपरजॉयमुळे गुजरातमधील विविध बंदरात अतिधोकादायकतेचा इशारा देणारा १० नंबरचा बावटा लावण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीपरजॉय चक्रीवादळाच्या तीव्रतेच्या झळा मुंबई, पालघर, रायगड परिसरात उमटू लागल्या आहेत.काही ठिकाणी किनारपट्टीवरील घरांची नासधूस झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.समुद्रात उसळत्या ५ मीटर उंचीच्या लाटांमुळे खबरदारी उपाययोजना म्हणून शुक्रवारपासून सलग पाच दिवसांपासून गेटवे -एलिफंटा, मोरा -भाऊचा धक्का, जेएनपीए -भाऊचा धक्का,रेवस-करंजा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. एक जून पासून पावसाळी मासेमारी बंदीनंतर हजारो मासेमारी नौका उरण परिसरातील मोरा, करंजा, खोपटा, गव्हाण,वशेणी आदी विविध बंदरात याआधीच नांगर टाकून विसावा घेत आहेत. सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावातील नागरिक, मच्छीमारांना संभाव्य नुकसानीच्या भीतीचे ग्रासले आहे.
जेएनपीए बंदरही चक्रीवादळाचा व सातत्याने बदलत्या हवामानाचा अंदाज घेत आहे. “जोरदार आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कंटेनर जहाजांच्या हालचालींवर मर्यादा येतील,” असे बंदर प्राधिकरणाने सांगितले.नांगरलेल्या सर्व जहाजांना त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. "कंटेनर जहाजे वगळता, हवामान विभागाचे धोक्याचा इशारा मिळेपर्यंत टग बोटींद्वारे पायलट बोर्डिंगसह इतर जहाजांच्या हालचाली सुरू राहतील."अशी माहिती जेएनपीएच्या अधिकृत सूत्रांनी दिली.