- निखिल म्हात्रेअलिबाग _ रविवारी मध्यरात्री व सोमवारी दिवसभर रायगड जिल्ह्यात सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस हा प्राधान्याने धरण क्षेत्रात अधिक पडल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. २८ धरणांपैकी १३ धरणे ही शंभर टक्के भरली असून, सर्व धरणांत मिळून ७४.७६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
तेरा धरणे भरली असून, दोन धरणांत ९० टक्के पाणीसाठा आहे. तेरा धरणांमध्ये ७० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. रायगड २० दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, रविवारी मध्यरात्री अलिबाग, मुरुड, म्हसळा, तळा, श्रीवर्धन या तालुक्यांत अतिवृष्टी झाली. ९ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण तीन हजार ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ३५ टक्के पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण चांगले आहे.
शंभर टक्के पाणीसाठारायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याअंतर्गत २८ लहान धरणे येतात. त्यापैकी तळा तालुक्यातील वावा, सुतारवाडीमधील रोहा, सुधागडमधील कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, म्हसळामधील पाबरे, संदेरी, महाडमधील वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, खालापूर भिलवले, पनवेलमधील मोरबे ही तेरा धरणे शंभर टक्के भरली आहेत. मुरुड तालुक्यातील फणसाड ९९ टक्के, पनवेलमधील उसरण ९० टक्के भरले आहे. श्रीवर्धनमधील कुडकी ८३ टक्के, पेणमधील अंबेघर ८० टक्के भरले.