रायगडला बनविणार टूरिझम डेस्टिनेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:34 AM2023-02-06T11:34:43+5:302023-02-06T11:35:00+5:30
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प पूर्ततेकडे नेण्याकडे माझा भर असणार आहे.
दवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा असून समस्त देशासाठी प्रेरणादायी आहे. इथली संस्कृती, परंपरा जपतानाच नावीन्यपूर्ण व अद्यावत योजना राबवत हा इतिहास जगापुढे मांडण्याची गरज आहे. त्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या औद्योगिकीकरण, शेती व पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यावर आपला भर राहणार आहे. जेणेकरून ठराविक मुदतीमध्ये ते कार्यान्वित होतील.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प पूर्ततेकडे नेण्याकडे माझा भर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाचे रायगड विकास प्राधिकरण कार्यरत आहे. युवराज संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत या समितीचे काम प्रगतिपथावर आहे. प्राधिकरणाला विकासकामासाठी ६५० कोटींची मंजुरी मिळालेली असून आतापर्यंत १२० कोटींचा निधी मिळाला आहे. याठिकाणची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
राज्यातील कोकण विभागातील रायगड हा एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. नवनवीन कंपन्या याठिकाणी येण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी पुरक मूलभूत सुविधा म्हणजे रस्ता, वीज व पाण्याची पूर्तता प्राधान्याने करावी लागणार आहे. प्रलंबित प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेऊन कृती आराखडा बनविला जाईल.
शेती हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. बळीराजाचे जीवन अधिक समृद्ध होण्यासाठी येथील पारंपरिक पिकाच्या उत्पादनाबरोबरच कृषीला पुरक नवनवीन उत्पादनाची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान व पीक पाणी पुरविण्यासाठी योजना राबविल्या जातील. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्यासाठी जेटी उभारण्यापासून ते सुरक्षित मासेमारी करण्यापर्यंत प्रस्तावित प्रकल्पाचा पाठपुरावा केला जाईल.
- रायगड जिल्ह्याला इतिहासाबरोबरच निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. पुरातन ऐतिहासिक स्थळे, अलिबाग, वरसोली, काशीद, श्रीवर्धन, मांडवा या ठिकाणी आकर्षक समुद्रकिनारे लाभले आहेत.
- आवश्यक सुविधांची उभारणी करावी लागेल. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायतींशी समन्वय साधून उपलब्धता केली जाईल.
- पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे जिल्ह्यात आहेत. मुरुड जंजिरा किल्ला, महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलिफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देणारे आहेत. येथे राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशविदेशातून ही पर्यटक येत असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा, साधनांची उभारणी केली जाईल. पर्यटन व्यवसायामध्ये वृद्धी झाल्यास स्थानिक रोजगारही वाढेल. व्यापारी, विक्रेत्यांना त्यांचा लाभ होईल, या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्यावर आपला भर असेल.
डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड