रायगडला गतवैभव प्राप्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:08 AM2017-12-25T01:08:26+5:302017-12-25T01:08:26+5:30
रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले
महाड : रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. रायगड संवर्धन प्रकल्प हे एक आव्हान म्हणून आपण स्वीकारले असून, रायगडला गतवैभव प्राप्त करून देण्यात आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने ६०० कोटी खर्चाचा रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, छत्रपती संभाजीराजे हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. रविवारी गडाला भेट दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी राज सदरेसमोरील बॅरिकेट्स काढण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाला दिले. त्यानुसार या
बॅरिकेट काढून टाकण्यात आल्या. येत्या महिन्याभरात प्रत्यक्षात रायगड संवर्धन प्रकल्पाच्या विविध कामांना प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
या रायगड संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून किल्ले रायगडवरील वास्तूंचे आहे त्याच स्वरूपात जतन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ध्वनी व्यवस्थेच्या माध्यमातून गडावरील वास्तूंचे शिवकालीन महत्त्व, गडावरील शिवकालीन प्रसंगांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. रायगड प्रदक्षिणा मार्गाचे मूळ नैसर्गिक आणि भौगोलिक स्वरूप आहे, तसेच ठेवून या मार्गावर माहिती केंद्र त्याचप्रमाणे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील जैवविविधतेची माहिती देण्याचाही आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड संवर्धन प्रकल्पात केवळ रायगड किल्ल्याचाच नव्हे, तर रायगड परिसरातील २९ गावांचाही समावेश करण्यात आला आहे. महाड रायगड मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार असून, हा मार्ग दुपदरी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या विविध गावांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत स्थानिकांना विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.