- जयंत धुळप अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात अंतिम मतदान ६१.७७ टक्के झाले आहे. २०१४ च्या ६४.५७ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा मतदानाचे प्रमाण २.८० टक्क्याने घटले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान पेण विधानसभा मतदारसंघात ६५.१७ टक्के झाले तर उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात अलिबाग विधानसभा मतदारसंघात ६४.८९ टक्के, दापोली विधानसभा मतदारसंघात ६१.७१ टक्के, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात ५९.५९ टक्के, गुहागर विधानसभा मतदारसंघात ५९.१९ टक्के तर महाड विधानसभा मतदारसंघात ५९.३१ टक्के मतदान झाले आहे.पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे अधिक प्रमाण असणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील श्रीवर्धन, दापोली व गुहागर या तीन मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांनी अधिक प्रमाणात मतदान केले आहे. अलिबाग, पेण व महाड विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांचे मतदान महिलांपेक्षा अधिक आहे.मतदार यादी अचूक आणि परिपूर्ण असण्यावर निवडणूक आयोगाने भर दिला होता. त्यामुळे सातत्याने रायगड जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमांत मतदारांना विश्वासात घेऊन यादींचे अद्ययावतीकरण सुरू होते. मतदारांनी देखील त्याला चांगला प्रतिसाद दिला, असे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. मतदारांना सर्व प्रकारचे अर्जांचे नमुने वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आले होते, तसेच मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळच्या वेळी अर्ज भरून घेऊन ते अद्ययावत केल्याने ऐन मतदानाच्या दिवशी कुठल्याही तक्रारी आल्या नाहीत किंवा यादीत नाव नसल्यावरून, चुका असल्यावरून गोंधळ निर्माण झाला नाही. मतदार ओळखपत्रांचे वाटप व्यवस्थित झाले होते. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही त्यांना इतर ११ ओळखपत्र पुरावे पाहून मतदान करता आल्याने मतदारास कोणतीही अडचण आली नसल्याचे त्यांनी सांगितले.रायगड मतदारसंघातील संपूर्ण मतदान प्रक्रियेतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी अधिकारी व कर्मचाºयांचे सातत्याने प्रशिक्षण विविध स्तरांवर सुरू होते. त्याचा लाभ प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी झाल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. गेल्या आठवड्यात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान यंत्रांची प्रात्यक्षिके तसेच प्रत्यक्ष कर्मचाºयांकडून त्यावर सराव करून घेतल्याने त्यांच्यात आत्मविश्वास आला होता. पोलिसांनादेखील विशेषत्वाने सहभागी करून घेतले होते. या प्रशिक्षणामुळे मतदानाच्या दिवशी मतदान यंत्र जोडणी, हाताळणी आदीबाबत अडचण उद्भवली नाही.यंदा नोटाला जास्त मते पडण्याची शक्यता?मुरुड : रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रावर मतदान झाले आहे. या मतदारसंघातून मातब्बर उमेदवारसह १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते, तर १७ व्या क्रमांकावर नोटाचा पर्याय उपलब्ध होता. ‘नोटा’ म्हणजेच ‘यापैकी कोणीही योग्य नाही’.या निवडणुकीत १ ते १६ उमेदवारांना एका मतदान मशीनमध्ये जागा देण्यात आली होती. तर १७ व्या क्रमांकावर असणाºया नोटासाठी दुसºया एका मतदान मशीनची व्यवस्था करण्यात आली होती. दोन मतदान मशीनमुळे ज्याला पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे मतदान करावयाचे असल्यास ग्रामीण भागातील निरक्षकर मंडळींकडून चुकून नोटांचे बटन दाबून पहिल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान केल्याचा भास निर्माण होऊन ही मते नोटाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दोन्ही मशीन अगदी शेजारी ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील निरक्षर लोकांना प्रथम क्रमांकाचे बटन दाबा असे प्रचार करणाºया पक्षाकडून सांगण्यात येत होते, त्यामुळे दोन्ही मशीन शेजारी असल्यामुळे कदाचित दुसºया मशीनचे प्रथम पसंतीचे बटन दाबल्याने नोटाला जास्त मतेसुद्धा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व जर तरच्या गोष्टी असून हे चित्र २३ मे रोजी मतदान निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
रायगडमध्ये मतदानात महिला आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:09 AM