इंटरनेट घ्या आधाराला, पण पेन-कागद घेऊन केलेला अभ्यासच खरा; UPSC सर केलेल्या प्रणवचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 01:24 PM2018-04-28T13:24:01+5:302018-04-28T13:24:01+5:30

रायगड जिल्ह्याच्या मोहोपाडा गावातील प्रणव यूपीएससी परीक्षेत देशात १६६वा आला आहे.

raigad youth pranav kanitkar ranks 166th in UPSC exam | इंटरनेट घ्या आधाराला, पण पेन-कागद घेऊन केलेला अभ्यासच खरा; UPSC सर केलेल्या प्रणवचा सल्ला

इंटरनेट घ्या आधाराला, पण पेन-कागद घेऊन केलेला अभ्यासच खरा; UPSC सर केलेल्या प्रणवचा सल्ला

googlenewsNext

मुंबईः गुगल गुरूंना वंदन केल्याशिवाय आज आपला दिवस पूर्ण होणं केवळ अशक्य झालंय. इंटरनेटच्या काळात जगभरातील माहिती आपल्या खिशात सामावली आहे. हे सगळं खरं असलं तरी, पेन आणि कागद घेऊन केलेला अभ्यासच खरा, यूपीएससीसारख्या मोठ्या परीक्षांना सामोरं जाताना तोच उपुयक्त ठरतो, असा मोलाचा सल्ला प्रणव कानिटकर या यशवंत तरुणानं 'लोकमत'शी बोलताना दिला आहे. रायगड जिल्ह्याच्या मोहोपाडा गावातील प्रणव यूपीएससी परीक्षेत देशात १६६वा आला आहे. आत्मविश्वास न गमावता, हार न मानता, पाचव्या प्रयत्नात त्यांनं मिळवलेलं हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे. 

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज माहितीचे अनंत स्रोत उपलब्ध झालेत. ही जशी जमेची बाजू आहे, तशीच धोक्याचीही आहे. कारण, एवढी माहिती बऱ्याचदा गोंधळ उडवून देते. त्यामुळे योग्य स्रोतांमधून माहिती मिळवणं, तिचं नियोजन करणं आणि आपल्या अभ्यासाची पद्धत ओळखून ती आत्मसात करणं हेच यशाचं गमक असल्याचं प्रणवनं सांगितलं. मोबाइल, टॅब्लेट किंवा संगणकावर दिवसभर माहिती वाचली, तरी ती डोक्यात फिट्ट बसेलच असं नाही. म्हणूनच, कागद-पेन घेऊन बसण्याशिवाय पर्याय नाही, असं त्यानं नमूद केलं.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा २०१७ या वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकला आहे. या गुणवंतांपैकी एक असलेल्या प्रणवसाठी हा निकाल म्हणजे सुखद धक्काच आहे. कारण, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी होती. चार वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता, तो पाचव्यांदा या परीक्षेला बसला होता आणि अखेर त्यानं आपलं ध्येय गाठलंच. माझी मेहनत आणि जिद्द आहेच, पण आई-वडील आणि भाऊ यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मी मिळवू शकलो, अशी प्रांजळ भावना प्रणवने व्यक्त केली.

प्रणवने आपलं बारावीपर्यंतचे शिक्षण रसायनी-मोहोपाडा येथील जे.एच.अंबानी स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर, पुण्यातील एस.पी.कॉलेजमधून तो बी.ए. झाला. पुढे, पुण्याच्याच गोखले इन्स्टिट्यूटमधून इकॉनॉमिक्स विषयात त्यानं एम.ए. केलं. यूपीएससीकरीता हिन्दी साहित्य हा अतिरिक्त विषय त्याने निवडला होता. दरम्यानच्या काळात प्रणवनं गुरुग्राम येथे अॅनालिटीक्स कंपनीत नोकरी केली. वेळेचं सुयोग्य नियोजन करून त्याने यूपीएससीचा अभ्यासही नेटाने सुरू ठेवला होता. त्याच्या या परिश्रमांचं आज चीज झालं आहे. 

प्रणवचे वडील अनंत महादेव कानिटकर हे मोहोपाडा-रसायनी औद्योगिक वसाहतीमधील बॉम्बे डाईंग कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कायर्रत होते, तर त्याची आई अनघा कानिटकर या व्यवसायाने वकील आहेत.

(Inputs: जयंत धुळप, रायगड)

Web Title: raigad youth pranav kanitkar ranks 166th in UPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.