ZPFMS प्रणालीत वार्षिक लेखा सादर करण्यात रायगड जिल्हा परिषद राज्यात प्रथम
By निखिल म्हात्रे | Published: September 22, 2022 04:39 PM2022-09-22T16:39:59+5:302022-09-22T16:40:33+5:30
१४ ऑक्टोबर २०२० अन्वये जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे ZPFMS या ऑनलाईन प्रणालीमधून करणे अनिवार्य केले आहे.
अलिबाग : गतिमान प्रशासन आणि पारदर्शक कामकाज यामुळे राज्यात रायगड जिल्हा परिषदेने आपले वेगळेपण जपले आहे. जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा लेखा झेडपीपीएमएस (ZPFMS) या ऑनलाईन प्रणालीमध्ये तयार केला असून, वार्षिक लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे सादर करण्याचा राज्यात पहिला बहुमान रायगड जिल्हा परिषदेने मिळविला आहे.
१४ ऑक्टोबर २०२० अन्वये जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे ZPFMS या ऑनलाईन प्रणालीमधून करणे अनिवार्य केले आहे. यामुळे राज्य स्तरावर ग्रामविकास विभागाकडून जिल्हा निहाय तसेच एकूण झालेला जमा व खर्च हा ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. सदर प्रणालीमुळे अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता, कार्यादेश, देयक तयार करणे, देयक तपासणी सूची, अखचित रक्कम शासन खाती भरणा करणे, या बाबी अत्यंत सोप्या व सुटसुटीत झाल्या आहेत.
ग्रामविकास विभागाने तयार केलेल्या ZPFMS या संगणकीय प्रणालीमध्ये कामकाज सुरु करून व ते पूर्ण करुन सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा वार्षिक लेखा विहीत वेळेत पूर्ण करुन स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे सादर करण्याचा पहिला बहुमान रायगड जिल्हा परिषदेला मिळाला आहे. सदर कार्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांचा सततचा पाठपुरावा आणि मार्गदर्शनाखाली सहाय्यक लेखाधिकारी छगन मावची, व ZPFMS राज्य समन्वयक संजीवनी घरत यांनी हे कामकाज विहीत वेळेत पूर्ण केले. वित्त विभागातील लेखा शाखेने केलेल्या कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.