- आविष्कार देसाई, अलिबाग
मांडावा कोळगाव येथील सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्या अविनाश कोठारी यांच्या आलिशान बंगल्यावर रायगड जिल्हा प्रशासनाने जेसीबी फिरवला. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिले होते.
2009 साली अविनाश कोठारी यांनी अनधिकृत बांधकाम केल्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. शंभू राजे युवा क्रांतीने ही याचिका दाखल केली होती. सदरचे बांधकाम हे करोडो रुपयांचे आहे. याचिका दाखल झाल्यानंतर कोठारी यांनी पुढे बांधकाम केले नाही. कोर्टाने फटकरल्या नंतर सीआरझेड बाबतच्या कारवाईला जोर आला. शुक्रवारी रायगड जिल्हा प्रशासनाने 2 जेसीबी आणि 12 कर्मचाऱ्यांसह बंगल्याचे बांध काम पडायला सुरुवात केली.
कोळगाव येथील सर्वे नंबर 307 मध्ये तब्बल 15 हजार वर्गफूटचे महाकाय बांधकाम करण्यात आले आहे. सदरचे बांधकाम हे संपूर्ण पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाला आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. पुढील 10 दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.