- जयंत धुळप अलिबाग : आजवरच्या निवडणुकांत रायगड लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांचे असणारे अत्यल्प असे ८ ते ९ टक्के मतदान तब्बल २७.७१ टक्क्यांवर पोहोचवण्यात यशस्वी झालेला रायगड जिल्हा परिषदेचा दिव्यांग मतदार वाहतूक व्यवस्थेचा आगळा पॅटर्न राज्यात कीर्तिमान ठरला आहे. आता मुंबई शहरातील ३०-मुंबई दक्षिण मध्य आणि ३१-मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा परिषदेचा हा पॅटर्न स्वीकारला आहे. मुंबईतील या दोन लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांच्या सुलभ मतदान प्रक्रियेकरिता रायगडमधील चार तालुक्यांतून तब्बल २०० व्हिलचेअर्स शुक्रवारी मुंबईस रवाना होणार आहेत. २९ एप्रिल रोजी मुंबईतील मतदान प्रक्रियेत त्याचा उपयोग होणार असल्याची माहिती या ‘रायगड झेडपी पॅटर्न’चे निर्माते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.दिव्यांग मतदारांच्या सुलभ मतदानासाठी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत राज्यात प्रथमच जिल्हा परिषदेस सहभागी करून घेण्याचा निर्णय रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला. त्यास रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी प्रतिसाद दिला. रायगडमधील सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण ७ हजार ३९४ दिव्यांग मतदारांना हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ न देता, त्यांचे मतदान सुलभतेने व्हावे याकरिता विशेष नियोजन केले. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींच्या अपंग कल्याण निधीमधून ८८६ व्हीलचेअर्स खरेदी केल्या. १५ तालुक्यांच्या १५ पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांकडे दिव्यांग मतदारास त्यांच्या घरून मतदान केंद्रांपर्यंत आणणे आणि गाडी केंद्रावर पोहोचल्यावर ग्रा.पं. कर्मचाºयाच्या मदतीने त्या दिव्यांग मतदारास व्हीलचेअर्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान केंद्रात नेण्यासाठी आणि मतदान झाल्यावर पुन्हा गाडीजवळ आणणे व घरपोच करणे अशी जबाबदारी सोपवली होती. सर्व विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाºयांनी आपल्यावर सोपवलेली ही जबाबदारी यशस्वी पार पडली.मुंबईला रायगडचे सहकार्यरायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग मतदार वाहतूक व्यवस्थेच्या पॅटर्नने दिव्यांग मतदान टक्केवारीत विक्रमी मतदान झाले आहे.मुंबईतदेखील दिव्यांग मतदारांच्या सुलभ मतदान प्रक्रियेकरिता हाच पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईत अपेक्षित असणाºया व्हीलचेअर्स भाडेतत्त्वावर उपलब्ध नाहीत.परिणामी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना विनंती केली असता, त्यांनी २०० व्हीलचेअर्स उपलब्ध करून दिल्या आहेत.परिणामी मुंबईतील ३०-मुंबई दक्षिण मध्य आणि ३१-मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना देखील आता सुलभतेने मतदान करणे शक्य होईल, अशी माहिती मुंबई शहर उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली आहे.रायगडमधील चार तालुक्यांतून तब्बल २०० व्हीलचेअर्स शुक्रवारी मुंबईस रवाना होत असून २९ एप्रिल रोजी मुंबईतील मतदान प्रक्रियेत सेवा देतील.-दिलीप हळदे,मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
‘रायगड झेडपी पॅटर्न’ आता मुंबईत राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:02 AM