रायगडचे किनारे देताहेत स्थानिकांना रोजगार; सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील

By निखिल म्हात्रे | Published: May 19, 2024 02:07 PM2024-05-19T14:07:57+5:302024-05-19T14:08:13+5:30

येथील सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा पर्यटकांकडूनही व्यक्त होत आहे.

Raigad's beaches provide employment to locals; If the facilities are increased, the tourists will increase | रायगडचे किनारे देताहेत स्थानिकांना रोजगार; सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील

रायगडचे किनारे देताहेत स्थानिकांना रोजगार; सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील

अलिबाग : सुमद्रकिनाऱ्यावर वसलेल्या रायगडचे पर्यटन वाढत असून, येथील सुमद्रकिनारे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे किनारे स्थानिकांना रोजगार देत आहेत. येथील सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा पर्यटकांकडूनही व्यक्त होत आहे.रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व आहे. तसेच हा जिल्हा पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अलिबाग, सारळ, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड, आगरदांडा, राजपुरी तर श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, श्रीहरिहरेश्वर, दिवेआगर, शेखाडी, बागमांडला, दिघी येथे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. या समुद्रकिनाऱ्यांवर पाऊस वगळता पर्यटकांची वर्दळ कायम असते.

काही वर्षांपूर्वी हे किनारे फारसे गजबजलेले नसायचे; परंतु प्राचीन लेणी, गडकिल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे, गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक धार्मिक स्थळे आदी पर्यटन स्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. स्थानिकांनी लॉजिंग बोर्डिंगसह व्हेज-नॉनव्हेज उपाहारगृहे, बोटिंग, विविध प्रकारची कटलरी सामान, लाँचसेवा, रो-रो सेवा, कोकण फूड बाजार, भेलपुरी, पाणीपुरी, कुल्फी, गोला व सरबत, नारळ पाणी, ताडगोळे, सुकी मासळी, विविध प्रकारच्या टोप्या, चहानाश्ता, लहान मुलांची खेळणी आदी व्यवसाय किनाऱ्यांवर सुरू झाल्याने पर्यटकांची सोय होण्याबरोबरच स्थानिकांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे. वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
करोना काळात दोन वर्षे शासनाने पर्यटकांना बंदी घातल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह सर्वच व्यवसाय ठप्प होते. यामुळे येथील व्यावसायिक कर्जबाजारी झाले होते. व्यवसायासाठी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा हप्त भरणेही कठीण होऊन बसले होते. कामगारांना पगारही देता येत नसल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाची बंदी उठल्यानंतर पर्यटनवाढीला चालना मिळाली आहे. त्यामुळे व्यवसायाने परत एकदा उभारी घेतली.

आर्थिक मंदी व टाळेबंदीमुळे मागील चार वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी रोडावली होती. मागील चार महिन्यांत पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्हा स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.
- मंदार पावशे, स्थानिक व्यावसायिक.

पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबरच समुद्रकिनारा, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न सोडविल्यास पर्यटकांची संख्या अधिक वाढू शकेल.
- भारती पाटील, पर्यटक.

Web Title: Raigad's beaches provide employment to locals; If the facilities are increased, the tourists will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.