लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औषध निर्मितीसाठी रायगडमधील नियोजित बल्क ड्रग पार्क (बीडीपी) हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रेंगाळला. त्याबाबत केंद्र सरकारकडून निधी मिळो अथवा न मिळाे राज्य सरकार हा प्रकल्प बनविण्यासाठी जमीन हस्तांतरणासह आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता करणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यांपासून रखडलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत विरोधकांकडून सरकारवर जाणीवपूर्वक खापर फोडले जात आहे. वास्तविक वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाप्रमाणे याच्या विलंबालाही तेच जबाबदार आहेत. आपल्याप्रमाणेच गुजरात व हिमाचल प्रदेशनेही प्रयत्न सुरू केले होते. मात्र, राज्य सरकारने त्यानंतर जागा निश्चिती व हस्तांतरण करण्यामध्ये दिरंगाई केली. अन्य राज्यांनी त्याबाबत आघाडी घेतल्याने केंद्राने त्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, राज्यातही तो राबविला जाऊ शकतो. राज्य सरकार व औद्योगिक विकास महामंडळाकडून त्यासाठीची पूर्तता केली जाईल.आंबेत पुलाच्या कामाची चौकशीरत्नागिरी- रायगड यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाचे बांधकाम निकृष्ट केल्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे याठिकाणी बोटीद्वारे एसटी बस नेण्यासाठी पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्यया प्रकल्पासाठीच्या जागेवर नवाबाचे वंशज व स्थानिकांसाठीच्या दर निश्चितीबाबत भूमिपुत्रांमध्ये नाराजी आहे. नवाबांच्या वंशजांबाबत स्पष्टता येत नसल्याने त्याऐवजी सर्व मोबदला स्थानिकांनाच द्यावा, अशी त्यांची मागणी आहे, त्यादृष्टीने लवकर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. जमीन व इन्फास्ट्रक्चर उभारण्यासाठी लागणाऱ्या साडेतीन हजार कोटी निधीची राज्य सरकारकडून तरतूद केली जाईल. नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सरकार आग्रही असणार आहे. - उदय सामंत, उद्याेगमंत्री